crime scene

    सातारा : गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी नाना पाटेकर उर्फ भावज्या भोसले (वय 21, रा. आरफळ ता. सातारा) याने जिल्हा रूग्णालयात कोरोना वॉर्डमधील भिंतीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महतेचा प्रयत्न केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एलसीबीने गंभीर गुन्ह्यात नाना पाटेकर उर्फ भावज्या भोसले याला अटक केली होती. यावेळी त्याची कोरोना चाचणी केली असता तो बाधित आढळला. यामुळे त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्याने दि. 20 रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मला बायको-पोरांना भेटायचे आहे, असे म्हणत भिंतीवर डोके आपटून घेतले. यात तो जखमी झाला असून, त्याने उपचारासाठी नकार दिला आहे.

    याबाबत पोलीस हवालदार नितीन पवार यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक वाघ करत आहेत.