शासन दराच्या पाचपटीने खिशावर डल्ला! “लॅब”वाल्यांचा धंदा कोरोना रुग्णांचा वांदा

निगेटिव्हला "पॉझिटिव्ह" पॉझिटिव्हला "निगेटिव्ह" वाई तहसीलदारांची फक्त तडजोडीची मलमपट्टी

    वाई  : राज्यातील जनतेवर आलेले कोरोना महामारीचे जीवघेणे संकट रोखण्यासाठी प्रथम कोरोना विषाणूची साखळी तोडणे गरजेचे आहे.  त्यादृष्टीने राज्यातील प्रत्येक शहर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांनी कोरोना टेस्ट करून घेण्याच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने राज्य शासनाने सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत तर काही खाजगी लॅबमध्ये शासकीय दरपत्रकानुसार कोरोना तपासणी सुरु करण्यात आलेल्या आहेत.  जेणेकरून संशयितलोकांच्या तपासण्या केल्यावर निगेटिव्ह व पॉझिटीव्ह लोकांची माहिती मिळून त्यांच्यावर तातडीने उपचार करणे सोयीचे होईल. वाई शहरातील काही खाजगी लॅबचालकांना याचा विसर पडल्याच्या तक्रारी नागरिकांमधून प्रचंड प्रमाणात वाढू लागल्या आहेत.  शासन दराच्या पाचपटीने लोकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे प्रकार सर्रासपणे चालू आहेत.  शिवाय निगेटिव्हला “पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला”निगेटिव्ह” रिपोर्ट देण्याचे धक्कादायक प्रकारही अनेक नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत.  त्यामुळे “लॅब”वाल्यांचा वाढलाय धंदा कोरोना रुग्णांचा मात्र झालाय वांदा! ,असे  म्हणायची वेळ अनेकांवर आली आहे. अशा भीषण परिस्थितीत वाई मधील मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या लॅबचालक प्रशासनाने माहिती घेऊन त्यांना दणका देण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.

    कोरोनाचे प्राथमिक निदान झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोन रुग्णावर घरीच औषध उपचार करणे सोपे होईल,
    कोरोनाची विषाणूची वाढती साखळी तोडण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त लोकांनी कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी राज्य शासनाने सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत तपासणी सुरु केलेली आहे. त्याच धर्तीवर खाजगी लॅब चालकांना शासकीय दरपत्रक ठरवून त्याप्रमाणे कोरोन टेस्ट करण्या साठी परवानगी दिलेली आहे.परंतु वाई शहरा मधील काही लॅब चालकांनी अक्षरशः कोरोन टेस्ट साठी जनतेच्या पैशाची लुटमार चालवलेली आहे. शासकीय दराच्या ५ ते ६ पट दराने हे लॅबचालक पैसे घेत आहेत. तपासणीचा शासकीय दर १५०/- रुपये असताना लॅब चालक मात्र लोकांकडून ६०० ते १००० रुपये घेताना दिसत आहेत.तरअनेकांना कोरोना रिपोर्ट उलटसुलट मिळत आहेत एका लॅब मध्ये आलेला पॉझिटिव्ह रिपोर्ट दुसऱ्या लॅब मध्ये चक्क निगेटिव्ह मिळत असल्याचा अनेकांना कटू अनुभव मिळत आहेत. लॅबचालकांवर कोणाचेही बंधन नसल्याने नागरिकांची आर्थिक लूटमार करून खाजगी लॅब चालक आपला कार्यभाग साधत आहेत. शासनाच्या दरपत्रकाचा फलक प्रत्येक लॅबचालकाने आपल्या लॅबमधील दर्शनी भागावर मोठ्या अक्षरात दिसेल असे लावण्यात यावेत,  अशी मागणी वाईच्या तहसीलदारांना काही सुज्ञ नागरिकांनी केली आहे.  परंतु फक्त कर्तव्यदक्ष अशी ओळख असणाऱ्या वाई तहसीलदार यांच्या कडून फक्त नोटीस प्रसिध्द करण्या व्यतिरिक्त आजतागायत कोरोना काळातील गैरप्रकारावर कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नसल्याने अनेकांच्या मनात तडजोडीच्या दाट शंका उपस्थित रहात आहे व आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.  याबाबत संबंधितावर काहीच कार्यवाही झाली नाही तर भविष्यात नागरिकांनाच मुजोर लॅब चालकांना धडा शिकवण्याची वेळ येवू शकते, असे जनतेतून बोलले जात आहे.  नोटीसा काढून मलमपट्टी करण्या पेक्षा याची तालुका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवुन शहरातील लॅब चालकांच्या मनमानी गैरकारभाराला चाप लावण्याची संतप्त भावना वाईकरांमधून व्यक्त केल्या जात आहेत.