गणेशवाडी येथे गायरान जमिनीच्या झाडाझुडपांनी लगतच्या शेतकऱ्यांचे नुकसान

    सातारा : सध्या कोरोना संकटाने सर्व क्षेत्रात मंदी पसरली आहे. नैसर्गिक आपत्तीने शेती उद्योग उद्भवस्त झाला आहे. अशातच गणेशवाडी ता. खटाव येथे गायरान जमिनीवरील झाडेझुडपांमुळे लगतच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत संबधित यंत्रणेकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

    गणेशवाडी ता. खटाव येथे अपंग शेतकरी नंदकुमार जमदाडे यांच्या मालकाची गट नंबर २२९/१ येथे एक एकर जमीन आहे. या जमिनीतून कांदा, घेवडा व कडधान्य पीक घेतले जाते. या जमिनी लगत गट नंबर २३१ ही गायरान जमीन आहे. या गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. त्याचा शेतकरी जमदाडे यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्वमालकीच्या शेतात नांगरट तसेच शेतीची मशागत करता येत नाही. शेतमजूर सुध्दा झाडे झुडपाच्या भीतीने या शेतात मजुरी करण्यासाठी येत नाही. दरवर्षी दोन ते तीन हजार रुपयांच्या शेती उत्पन्न सोडून द्यावे लागत आहे.

    याबाबत ग्रामपंचायत गणेशवाडी यांना तीन महिन्यांपूर्वी लेखी निवेदन दिले होते. अद्याप कार्यवाही न झाल्याने दोन दिवसांपूर्वी खटाव तहसीलदार किरण जमदाडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यांनी वस्तुस्थिती समजून घेतली व सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती सचिन नंदकुमार जमदाडे यांनी दिली.

    या गायरान जमिनीमुळे अपंग शेतकरी हतबल झाले आहेत. स्वतःहून झाडे झुडपे काढण्यासाठी गेले तर वादवादीचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी गायरान जमिनीतील झाडेझुडपे काढून न दिल्यास स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांची राहील, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.

    दरम्यान, कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे भूमिका आहे. त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांना सांगितले आहे.