साताऱ्यातील लाॅकडाउनचा निर्णय एकतर्फी , लोकप्रतिनिधी, व्‍यापाऱ्यांना विश्‍‍वासात घ्यावे : आमदार शिवेंद्रसिंहराजे

पुण्‍यात रुग्‍णसंख्‍या आटोक्‍यात येताना ती साताऱ्यातच का वाढते, याचाही प्रशासनाने विचार करणे आवश्‍‍यक आहे. अनेक लॅब पोर्टलवर अहवाल नोंदवत नाहीत. त्यामुळे कदाचित रुग्‍णवाढीचा आकडा फुगत असेल. शासनाने या आकडेफुगीचा विचार करणे आवश्‍‍यक असून सरसकट लॉकडाउन अन्‍यायकारक आहे.

  सातारा : कोरोनाबाधितांची संख्‍या आटोक्‍यात यावी, यासाठी पुकारलेल्‍या लॉकडाउनमुळे अर्थचक्र ठप्‍प झाले आहे. बाधित वाढावेत, अशी कोणाचीही इच्‍छा नाही. वीकेंड लॉकडाउन कडकडीत करा. पण, उर्वरित पाच दिवस वेळमर्यादेसह इतर सर्वांना व्‍यवसायाची परवानगी देण्‍याची गरज आहे. प्रशासनाच्‍या निर्णयाविरोधात असंतोष असून निर्णय घेण्यापूर्वी त्‍यांनी लोकप्रतिनिधींसह व्‍यापारी संघटनांना विश्‍‍वासात घेणे गरजेचे असल्‍याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नमूद केले.

  जि‍ल्‍ह्या‍चा तिसऱ्या टप्‍प्‍यात समावेश
  कोरोनाबाधितांची संख्‍या आटोक्‍यात आल्‍याने राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार जि‍ल्‍ह्या‍चा तिसऱ्या टप्‍प्‍यात समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्‍हा प्रशासनाने लॉकडाउनचे नियम शिथिल करत सर्व व्‍यवहारास परवानगी दिली होती. त्यानंतर आठवड्यात पुन्‍हा बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. वाढणाऱ्या रुग्‍णसंख्‍येचा आढावा घेत (शनिवारी) सकाळपासून जिल्‍हा प्रशासनाने पुन्‍हा एकदा कडकडीत लॉकडाउन जाहीर केला. या लॉकडाउनच्‍या अनुषंगाने शिवेंद्रसिंहराजेंनी मत मांडले.

  लॉकडाउनचा निर्णय घेताना प्रशासनाने सर्वांचा विचार करणे आवश्‍‍यक होते. एकतर्फी घेतलेल्‍या या निर्णयास सर्वांचा विरोध असून ते विविध माध्‍यमांतून व्‍यक्‍त करत आहेत. कोरोनासाठी नियम आवश्‍यक आहेत. पण, त्‍यासाठीचे निर्बंध कडक नसावेत. प्रशासनाने वीकेंड लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करावी. पण, उर्वरित पाच दिवस वेळमर्यादा, नियमांना अधीन राहून इतर व्‍यवसाय सुरू ठेवण्‍यास परवानगी देणे आवश्‍‍यक आहे.

  -शिवेंद्रसिंहराजे भोसले,आमदार

  आकडेफुगीचा विचार करणे आवश्‍‍यक
  पुण्‍यात रुग्‍णसंख्‍या आटोक्‍यात येताना ती साताऱ्यातच का वाढते, याचाही प्रशासनाने विचार करणे आवश्‍‍यक आहे. अनेक लॅब पोर्टलवर अहवाल नोंदवत नाहीत. त्यामुळे कदाचित रुग्‍णवाढीचा आकडा फुगत असेल. शासनाने या आकडेफुगीचा विचार करणे आवश्‍‍यक असून सरसकट लॉकडाउन अन्‍यायकारक आहे. असे निर्बंध लावताना प्रशासनाने लोकप्रतिनिधी,‍ व्‍यापारी संघटनांशी चर्चा करणे आवश्‍‍यक होते. सरसकट लॉकडाउनमुळे अर्थचक्र ठप्‍प झाले असून प्रशासनाने जाहीर केलेला लॉकडाउन मागे घ्‍यावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली अाहे.