टोलनाके बंद करण्याची रिपाइंची मागणी; जिल्हाध्यक्ष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन

    सातारा : सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे या दोन टोलनाक्यावर वाहनांना टोल द्यावा लागत आहे, तो तत्काळ बंद करण्यात यावा, या मागणीसाठी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी आंदोलनात टोल नाके बंद करा, अशा आक्रमक घोषणाही दिल्या. दरम्यान, आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

    आरपीआय आठवले गटाने आनेवाडी टोलनाक्यावरील आंदोलन रद्द केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस पथक तैनात करण्यात आले होते.

    आनेवाडी टोलनाका बंद करा, ही इच्छा सातारकरांची असली तरी याचा निर्णय हा केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याने तेच निर्णय घेवू शकत आहेत. मात्र, या टोलनाक्यावरील अरेरावी, दमबाजी तसेच रस्त्याच्या दुरवस्थेने सातारकर त्रस्त झाले आहेत. सातारकरांना या टोलमधून वगळण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेकवर्षापासून सुरुच आहे.

    या टोलनाक्याची मुदत संपूनही त्याला मुदतवाढ मिळाली जात आहे. मात्र, राजकीय वरदहस्ताने आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन अरेरावी करत असते अन् सर्वसामान्यांला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सातारकरांच्या मनात या टोलनाक्याबाबत असंतोष निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आक्रमक होत आनेवाडी येथे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, ८ सप्टेंबर रोजी प्रशासनाबरोबर चर्चा झाल्याने हे आंदोलन स्थगित करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.

    …तर आंदोलनाची आक्रमकता वाढवणार

    टोलनाक्याचा विषय हा केंद्रस्तरावर येत असल्यामुळे आपल्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठस्तरावर पाठवले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी देत आता याचा स्वतंत्रपणे पाठपुरावा करण्यास सांगितले. त्यावेळी सातारकरांच्या मानगुटीवर बसलेले भूत उतरण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना निवेदन देण्याची भूमिका घेतली आहे. येथेही हा प्रश्नाचा गांभीर्याने विचार न झाल्यास आंदोलन अजून आक्रमकपणे करणार असल्याचे अशोक गायकवाड यांनी यावेळी सांगितले.