कोरोना हॉटस्पॉट असूनही दहिवडी कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थ्यांची गर्दी

    दहिवडी : नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसून खटाव माण तालुके कोरोना हॉटस्पॉट आहेत, अशा परिस्थिती दहिवडी ता माण येथील दहिवडी कॉलेजमध्ये एकाचवेळी सर्व वर्गातील विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी एकत्र आल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. याबद्दल येथील शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या वतीने संतप्त होवून कॉलेज प्रशासनाला जाब विचारण्यात आला.

    सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दहिवडी कॉलेज हे महाविद्यालय असून, या कॉलेजमध्ये इयत्ता 11 वी पासून बी ए, बी कॉम,बी एस सी तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचेही कोर्सेस आहेत. कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना विविध शाखेत फॉर्म भरण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हे सर्व विद्यार्थी एकाच ठिकाणी जमा झाले होते. कोरोना हॉटस्पॉट असल्याने वास्तविक या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणं, कॉलेज प्रशासनाची महत्वाची जबाबदारी होती.

    या जबाबदारीकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांची गर्दी जमली, ही गोष्ट शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनास आली असता, या कार्यकर्त्यांच्या वतीने कॉलेज प्रशासनास जाब विचारण्यात आला. तांत्रिक अडचणींमुळे ही गर्दी झाली असून, यापुढे योग्य काळजी घेतली जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आले.