साताऱ्यातील प्रभाग क्रमांक एकमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ उद्या

    सातारा : सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे यांचा गुरुवारी (दि. १४) वाढदिवस साजरा होत असून, त्याचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक एकमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सीता हादगे या पुष्पगुच्छ, हार स्वीकारणार नसून शक्य झाल्यास वह्या भेट देण्यात याव्यात, त्याचे वितरण गोरगरीब विद्यार्थ्यांना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

    पाणी हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे सातारा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला प्रशासनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणून या विभागाकडे पाहिले जाते. सन २०२० मध्ये सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील नगरसेविका सीता राम हादगे यांना पाणीपुरवठा सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली.

    याच कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे काम करण्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी त्या अडचणींवर मात करत सीता हादगे यांनी स्वतः जातीने हजर राहून कास परिसरात जलवाहिनीला लागलेली गळती, सांबरवाडी- जकातवाडी पाणी पुरवठा योजनेच्या फिल्टरेशन प्लांटची स्वच्छता, समर्थ मंदिर परिसरात जलवाहिनीला लागलेली मोठी गळती ही कामे युद्धपातळीवर करून सातारकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी स्वतः विविध प्रभागांमध्ये पहाटेच्या वेळी जाऊन पाण्याबाबत त्यांनी नागरिकांचे प्रबोधन केले होते.

    दरम्यान, प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांकडून फार मोठ्या प्रमाणावर विकासकामांच्या अपेक्षा सातत्याने केल्या जात होत्या. मात्र, कोरोनाने मोठ्या प्रमाणावर अक्राळ-विक्राळ रूप धारण केल्यामुळे विकासकामे करण्यासाठी मर्यादा पडत होत्या. मध्यंतरीच्या काळात साताऱ्यातील कोरोना काहीअंशी आटोक्यात आल्यानंतर सीता हादगे यांनी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याशी चर्चा करून आपल्या प्रभागामध्ये विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सातारा विकास आघाडीचे नेते उदयनराजे भोसले यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत नगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे.

    सीता हादगे यांचा उद्या गुरुवारी वाढदिवस साजरा होत असून, त्याचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक एकमध्ये १५ लाख रुपये खर्चाचे शौचालय, पंताचा गोट येथे १५ लाख रुपये खर्चाचे शौचालय, कर्मवीर हाऊसिंग सोसायटी येथे ६५ लाख रुपयांचा मल्टीपर्पज हॉल, ७.५० लाख रुपयांची जिम, त्याच्या नजीकच ओढ्याला ७५ लाख रुपयांची संरक्षक भिंत, मनाली हॉटेल ते खंडोबा मंदिर दरम्यान १० लाख रुपये खर्चाचे गटर्स, खंडोबा मंदिरा पाठीमागे पवार मळा येथे २० लाख रुपये खर्चाचे गटर, बनसोडे वस्ती येथे ७५ लाख रुपये खर्चाची संरक्षक भिंत, गणेश कॉलनी अंतर्गत रस्ते, हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी असा विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या विकास कामांचा शुभारंभ उद्या गुरुवारी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व सर्व सभापतींच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.