स्थायी समितीच्या सभेत नगराध्यक्ष फंडावर चर्चा

    सातारा : नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या नगराध्यक्ष फंडातील शाहू कला मंदिराचे नूतनीकरण व वेगवेगळ्या वॉर्डात स्टील बेंच बसविणे यावर विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी आगपाखड केली. दीड तासाच्या सभेत शहरात औषध फवारणीचा विषय तहकूब झाला तर तांत्रिक कारणातून चार विषय रद्द करण्यात आले. एकूण 309 विषयांना यावेळी मंजूरी देण्यात आली.

    सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या सभेत विरोधी पक्ष नेता अशोक मोने यांनी शाहू कला मंदिर, बेंच खरेदी व आरोग्य विभागाच्या काही विषयांवर आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. संबंधित अधिकाऱ्यांना याची समर्पक उत्तरे देता आली नाही. शाहू कला मंदिराच्या सभागृहातील गळतीचा विषय चर्चेला आल्यावर खर्चाचे बजेट वाढले कसे ? तुम्ही काय केबिनमध्ये बसून बजेट बनविता काय ? या शब्दात ऍड. दत्ता बनकर यांनी अभियंता भाऊसाहेब पाटील यांची हजेरी घेतली. नगराध्यक्ष माधवी कदम यांच्यासह या सभेला मुख्याधिकारी अभिजित बापट, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, महिला व बालकल्याण सभापती स्नेहा नलवडे, विरोधी पक्ष नेता अशोक मोने आदींनी ऑनलाईन उपस्थिती लावली.

    सातारा पालिकेच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत स्थायी समितीच्या अनेक सभा झाल्या. मात्र, शुक्रवारी झालेल्या सभेत प्रथमच कोट्यवधी रुपयांचे तब्बल ३१४ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. दुपारी चार वाजता सभेला सुरुवात झाली. प्रारंभी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, त्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली. अजेंड्यावर विषयांची तपशीलवार माहिती देताना विरोधी पक्ष नेता अशोक मोने यांनी नगराध्यक्ष फंडातून तरतूद करण्यात आलेले स्टील बेंच, शाहू कला मंदिराचे नुुतनीकरणावर केलेला खर्च व आरोग्य विभागाच्या काही विषयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

    शहरातील ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणीच्या मुद्यावर सुद्धा अशोक मोने यांनी नाराजी व्यक्त करत फवारणी कुठे व कशी केली ? ही विचारणा केली. आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांना कोणतीच उत्तरे देता आली नाही. त्यामुळे हा विषय तहकूब करण्यात आला. नगराध्यक्ष फंडातील प्रशासकीय मंजूरी मिळालेली कामे पुन्हा कशी अजेंडयावर आली. मग नगराध्यक्षांना कामे मंजूर करावयाचा अधिकार नाही का ? अशी विचारणा करणारे लेखी पत्र माधवी कदम यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना दिले. अजेंड्यावर इतके विषय असताना केवळ नगराध्यक्ष फंडातील कामाची चर्चा कशासाठी ? या शब्दात नगराध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.