महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मेणबत्ती वाटप

    सातारा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्यातर्फे महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत कँडल मार्च काढून कंपनीच्या विरोधात मेणबत्ती वाटप करण्यात आले. माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेतर्फे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना मेणबत्ती आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले.

    संघटनेतर्फे ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, सक्तीची वसुली थांबवावी, छोटे व्यापारी, उद्योजक, शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत मिळावी. कंत्राटी कामगार यांची दादागिरी थांबवावी, अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे नूतनीकरण थांबवावे यासह एकूण १२ मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे निवेदन अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.

    यावेळी सातारा जिल्हा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना यांच्याकडून महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमर बेंद्रे, सातारा जिल्हाध्यक्ष अक्षय दौडे, जिल्हा महिला सचिव स्वाती केळकर, तालुका अध्यक्ष समाधान शेळके, अध्यक्ष मयुर करवले, शहर उपाध्यक्ष प्रशांत देशपांडे, शहर सचिव आशा सावंत, व इतर सदस्य उपस्थित होते.