करकंबच्या बोगस कोविड सेंटरवर जिल्हाधिकाऱ्यांची धाड; डेडिकेटेड कोविड सेंटरची मान्यता रद्द

    पंढरपूर : कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेमध्ये रुग्णांची संख्या जास्त झाल्यामुळे शेकडो रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी मोठी धावाधाव करावी लागली. अशा काळात अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी नवीन सेंटर निर्माण झाले. पण काही ठिकाणी असा कोविड हेल्थ सेंटरमधून रुग्णांची लूट झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे रुग्णालयाने केलेल्या मोठमोठ्या चुकांमुळे रुग्णालयातील अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. करकंब येथील जगताप हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची मान्यता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे.

    करकंब येथील जगताप हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी या हॉस्पिटलची तपासणी केली. तपासणी दरम्यान अनेक गंभीर प्रकार समोर आल्यामुळे या तपासणी दरम्यान काही मुद्द्यांच्या अनुषंगाने दिलेल्या नोटीसवर हॉस्पिटलचे डॉक्टर पांडुरंग बलभीम जगताप यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.

    या रुग्णालयात अनेक गंभीर प्रकार सुरू असल्याचे दिसून आले आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांच्या कोऱ्या केस पेपरवर स्वाक्षरी घेणे, कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्यांचे अहवाल उपलब्ध नसणे, कोणत्याही रुग्णावर क्लिनिकल प्रोटोकॉलनुसार उपचार न करणे, रुग्णांना डिस्चार्ज देताना डिस्चार्ज समरी उपलब्ध नसणे, आंतर रुग्ण असलेल्या रुग्णांच्या पेपर वर कोणताही नोट्स नसणे, कोविडचे बिलबुक उपलब्ध नसणे, रुग्णालयाच्या दर्शनी भागात कोणत्याही प्रकारचे दरपत्रक न लावणे, याशिवाय रुग्णालयामध्ये डॉक्टर पांडुरंग जगताप एमडी मेडिसिन हे एकटेच रुग्णांना सेवा देत असल्याचे लक्षात आले असून, रुग्णांना इंजेक्शन देताना फिजीशियन लोकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून स्वतः इंजेक्शन देण्याचा गंभीर प्रकार होत असल्याचे आढळून आले आहे.

    या हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवा देण्यासाठी कुर्डुवाडी येथील डॉ. रोहित बोबडे यांनी लिखित स्वरूपात संमती दिली होती. परंतु डॉ. बोबडे यांनी एकही दिवस आपली सेवा दिलेली नाही. तपासणी अहवालामध्ये कोणतेही परीक्षण न करता केवळ फोनवरून उपचारासंबंधी माहिती दिली असल्याचे आढळून आले. यामुळे जगताप हॉस्पिटलला मोठा दणका देत जिल्हाधिकारी यांनी डेडिकेटेड कोविड सेंटरची मान्यता कायमस्वरूपी केलेली आहे.

    या प्रकारामुळे करकंब व आसपासच्यार परिसरात मोठी खळबळ उडाली असून, ज्यांनी या सेंटरमध्ये उपचार घेतले, त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. डॉक्टर मंडळींना सध्या देव माणूस मानले जात आहे. परंतु काही देव माणूस म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर हे सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकून त्यांना लुटण्याचे प्रकार होत असल्याचे सध्या दिसून येत आहे.