जमीन खरेदीची रोख रक्कम दस्त नोंदणी कार्यालयात आणू नका : तहसीलदार जमदाडे

    वडूज : वडूज येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये दस्त नोंदणीचे दुय्यय निबंधक कार्यालय आहे. खटाव तालुक्यातील मालमत्ता व जमीन व्यवहाराबाबत कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी अनेक जण वडूज तहसील कार्यालयात दस्त घेऊन दुय्यम निबंधक नोंदणीसाठी भेट देतात. या ठिकाणी व्यवहारांची रोख रक्कम संबंधितांनी आणू नये, अशी सक्त सूचना खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली आहे.

    याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यामध्ये आर्थिक अडचणी व गरज म्हणून काही जणांना मालमत्ता व जमिनीची व्यवहार करावे लागतात. यासाठी लागणारी शासकीय कर आकारणी भरावी लागते. तसेच लिहून देणारा व लिहून घेणारा तसेच साक्षीदार यांना दुय्यम निबंधक यांच्या समक्ष हजर राहावे लागते. या व्यवहारासाठी विश्वास महत्वाचा घटक असतो. तसेच दिलेला शब्द पाळण्याची प्रथा आहे. अलीकडच्या काळात नातेसंबंधात ही विश्वास नसल्याने अशा व्यवहाराची रक्कम वाटप करताना सध्या दुय्यम निबंधक कार्यालयातच पैसे देण्याचे व्यवहार होऊ लागले आहे.

    वडूज येथील प्रशासकीय कार्यालयात पहिल्या मजल्यावरील निबंधक कार्यालयाच्या जिन्यालगत मोकळ्या जागेत उघड्यावर व्यवहाराच्या पैशाचे वाटप होत असल्याने अनेकांच्या नजरा त्या पैशावर लागलेल्या असतात. काही वेळेला पैसे हरविणे, लुटमारीचेही प्रकार घडू शकतात, ही बाब खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या निदर्शनास जनता क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान कमाने, दत्ता केंगार, अजित जगताप यांनी आणून देऊन पुरावे सादर केले होते.

    याची गंभीर दखल घेऊन तहसीलदार जमदाडे यांनी दुय्यम निबंधक विक्रम खडके यांना दालनात बोलवून याबाबत सविस्तर चर्चा करून सूचना केली. त्यानुसार दुय्यम निबंधक कार्यालयात मालमत्ता व जमीन खरेदी-विक्रीबाबत आर्थिक व्यवहाराची रोख रक्कम आणू नये, असे सूचना फलक लावण्याची उपयुक्त सूचना देण्यात आली आहे. त्याची दोन दिवसात अंमलबजावणी केली जाणार आहे. या मार्गदर्शक सूचनांच्या नियमांचे पालन करावे असेही स्पष्ट केले आहे.