…म्हणून डॉक्टरने पाया पडून तृतीयपंथीयांची मागितली माफी

    सातारा : उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आलेल्या तृतीयपंथीयांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांनी तब्बल दोन तास जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात गोंधळ घातला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर तृतीयपंथीयांना अपशब्द वापरणाऱ्या डॉ. प्रकाश पोळ यांनी पाया पडून अक्षरशः माफी मागितली .

    या प्रकाराने रूग्णालय व्यवस्थापनाची रुग्णांच्या प्रती किती आस्था आहे? याचे विदारक दर्शन घडले . सोमवारी सकाळी काही तृतीयपंथीय जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता आले होते. त्यावेळी उपचार कक्ष क्रमांक अठरामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पोळ उपस्थित होते. तृतीयपंथीयांपैकी एकाने डॉक्टरांना फॉर्म भरून देण्याची विनंती केली. तेव्हा डॉ. पोळ यांनी त्यांना आम्हाला फक्त इतकेच काम आहे का? असे सुनावले.

    या प्रकारामुळे प्रक्षुब्ध झालेल्या तृतीयपंथीयांनी वैद्यकीय उपचार कक्षात गोंधळ घालायला सुरवात केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.पहिल्यांदा डॉक्टरांनी फारसा प्रकार मनावर घेतला नाही. पण तृतीयपंथीयांचा रुद्रावतार बघून गांगरले. त्यांनी डॉक्टरांना चांगलेच खडेबोल सुनावले. उपचार सेवा खंडित होऊन या गोंधळनाट्याने एकच खळबळ उडाली. शेवटी तृतीयपंथीयांनी रागाच्या भरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांचे दालन गाठून डॉ. पोळ यांची तक्रार केली. डॉक्टरांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध केला.

    डॉ. चव्हाण यांनी पोळ यांना केबिनमध्ये पाचारण करून संबंधितांची माफी मागण्यास सांगितले. सुरवातीला डॉ पोळ यांनी सॉरी म्हणून वेळ निभावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तृतीयपंथीयांनी डॉक्टरांनी पाया पडून माफी मागण्याचा आग्रह करत गोंधळ सुरूच ठेवला. शेवटी नाईलाज झाल्यानंतर डॉ. पोळ यांनी संबंधित तृतीयपंथीयाची माफी मागितली. यापुढे माझ्याकडून असे वर्तन घडणार नाही याची ग्वाही दिली . डॉ. पोळ यांना डॉ. चव्हाण यांनी ही या घटना नाट्यानंतर चांगल्याच कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल रुग्णांची कायम का तक्रार असते ? याचे प्रत्यंतर या घटनेच्या निमित्ताने आले .