कोरोना काळात महाराष्ट्रातील माणसुकीचे जवळून दर्शनही घडले : डॉ. प्रिया शिंदे

    वडूज : कोरोना महामारीच्या काळात मानवाचे जीवनमान पूर्णतः बदलून गेले आहे. तर या काळात महाराष्ट्रात माणसुकीचे जवळून दर्शनही सदृश्य पाहावयास मिळाले. निरपेक्ष मदत ही जागृत समाज मनाचे प्रतिबिंब असल्याचे मत डॉ.प्रिया महेश शिंदे यांनी व्यक्त केले.

    खटाव येथे श्री काडसिद्धेश्वर कोविड सेंटरला सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय धुमाळ व पत्नी शकुंतला धुमाळसह परिवार आणि खटाव पत्रकार संघाच्या वतीने गहू, तांदूळ, तेल, सॅनिटायझर, मास्क व रोख रक्कम भेट देण्यात आली. यावेळी डॉ.शिंदे बोलत होत्या. उपसरपंच अमरसिंह देशमुख, संभाजीराजे शिंदे, चंद्रशेखर जाधव, मुन्ना मुल्ला, अविनाश कदम, किरण देशमुख, सुधाकर घाडगे, नितीन राजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    डॉ शिंदे म्हणाल्या, प्रत्यक्ष कृतीयुक्त कार्य करणाऱ्या धुमाळ परिवारासह खटावच्या पत्रकारांचे कार्य गौरवास्पद आहे. लोकशाहीतील चौथ्या स्तंभाचे हे कार्य निश्चितच राज्याला दिशादर्शक ठरेल. धुमाळ गुरुजी म्हणाले, नोकरीत ज्ञानदानाद्वारे समाज घडविण्याचे काम केले, आता समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्ण करण्याचा अल्पसा प्रयत्न केला.

    सामाजिक बांधिलकी जोपासण्याबरोबरच समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक व पत्रकारच करू शकतात, असे प्रास्ताविकात संजय देशमुख यांनी सांगितले. स्वागत शशिकांत धुमाळ यांनी केले. राजेंद्र शिंदे व नदीम मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले तर नम्रता भोसले यांनी आभार व्यक्त केले. यावेळी शर्वरी धुमाळ, मृणाली धुमाळ, शौर्य धुमाळ उपस्थित होते.