सभासदांमार्फत ईडीने ‘जरंडेश्वर’ चालवावा; शालिनीताई पाटील यांची मागणी

    कोरेगाव : श्री जरंडेश्वर साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा यंदाच्या हंगामासाठी नोंद असणाऱ्या उसाचे गाळप व्हावे. कामगारांच्या हाताला काम मिळून रोजगाराचा प्रश्न मिटावा. ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेस काम मिळावे. यासाठी कारखाना सभासद व आपल्या माध्यमातून कारखाना सुरु करावयाचा असल्याने याबाबत तातडीने मार्गदर्शन करावे. तसेच ईडीमार्फत सभासदांच्या वतीने हा कारखाना चालवण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी मुंबई येथील ईडी कार्यालयाकडे केली आहे.

    याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईडीमार्फत जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरू आहे. कारखान्याची जप्ती करून कारवाई केल्याने सभासदांना पुन्हा कारखाना मिळणार आहे. सभासदांमार्फत कारखाना सुरू करावयाचा झाल्यास आर्थिक विषय महत्वाचा आहे. यासाठी ईडीमार्फत कारखाना सुरू करावा किंवा एखादी आर्थिक सक्षम संस्थेबरोबर घेऊन सभासदांच्या वतीने कारखाना सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी. यामुळे यंदाच्या हंगामात कारखाना कार्यक्षेत्रात असणारा गळीतचा ऊस गाळप करता येईल. यातून ऊसतोड मजुरांनाही रोजगार मिळेल.

    महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने केलेला कारखान्याचा विक्री व्यवहार बेकायदेशीर असून, तो रद्द व्हावा व कारखाना सभासदांना मिळावा. यासाठी खटला दाखल केला होता. आजही तो खटला सुरू आहे. 2015 मध्ये गुरू कमोडिटीज्ने कारखान्याची कोणतीही डेव्हलपमेंट करू नये, असे आदेश दिले असताना गुरू कमोडिटीजच्या नावाखाली जरंडेश्वर शुगर मिल्सने पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व पंढरपूर अर्बन को. ऑप बँकेकडून शेकडो कोटींचे कर्ज घेऊन कारखान्यावर मोठी बांधकामे केली आहे. त्यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असून, न्यायालयाचा अपमान केला आहे.

    जरंडेश्वर शुगर मिल्सने काढलेल्या कर्जाची जबाबदारी ही कारखाना पुन्हा सभासदांना देताना कर्जमुक्त होऊन मिळावा. सध्याच्या कर्मचाऱ्यांना यापुढेही समाविष्ट करून घेता येईल. कारखान्यांचा २०२१-२२ चा गळीत हंगाम हा ऑक्टोबर २१ मध्ये सुरू करावयाचा असल्याने कारखाना सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करावे. यामुळे वेळेत कारखान्यातील दुरूस्तीची कामे व तोडणी यंत्रणा भरणे इत्यादी कामे करुन कारखाना सुरु करता येईल, असेही शालिनीताई यांनी म्हटले आहे. निवेदनावर व्हाईस चेअरमन शंकरराव भोसले, संचालक दत्तात्रय धुमाळ, श्रीरंग सापते, अक्षय बर्गे, कार्यकारी संचालक बी. ए. घाडगे यांच्या सह्या आहेत.