शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत होणार शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन

साताऱ्यातील तत्कालीन नामवंत वकिल कै रावबहाद्दर काळे यांनी आपल्या पत्नी सत्यभामाबाई काळे यांच्या स्मरणार्थ राहता वाडा कन्या शाळेला दिला .

    सातारा: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्या शाळा सातारा या शाखेचा शताब्दी सोहळा शुक्रवार( दि २२ ऑक्टोबर )पासून सुरू होत आहे . या शताब्दी सोहळ्याचे शानदार उद्घाटन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती कन्या शाळा शाला समितीचे अध्यक्ष दत्ताजी थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली .

    यावेळी शाला समिती उपाध्यक्ष केदार शालगर, कन्या शाळा प्राचार्य, कविता जगताप, उपप्राचार्य हणमंत भांडवलकर बीसीए कॉलेज प्राचार्य व संस्थेच्या आजन्म सेविका समीक्षा निकम, पर्यवेक्षक चंद्रकांत ढाणे, पर्यवेक्षक लक्ष्मण एकळ , प्रसिद्धी विभाग प्रमुख सुप्रिया चव्हाण यावेळी उपस्थित होते .

    थोरात पुढे म्हणाले, महषी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या उपस्थितीत २२ ऑक्टोबर१९२२ रोजी साताऱ्यात सात विद्यार्थीनींवर कन्या शाळा परांजपे वाडा येथे सुरू झाली .धोंडो कर्वे यांच्या आग्रहानुसार कमलाबाई देशपांडे यांनी अध्ययनाचे काम स्वीकारले . साताऱ्यातील तत्कालीन नामवंत वकिल कै रावबहाद्दर काळे यांनी आपल्या पत्नी सत्यभामाबाई काळे यांच्या स्मरणार्थ राहता वाडा कन्या शाळेला दिला . संस्थेच्या माध्यमातून कन्या शाळेच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक , तंत्रशिक्षण तसेच संगणक व व्यवसाय शिक्षण विभागाच्या कार्याचा आणि विस्ताराचा आढावा त्यांनी घेतला .

    कन्या शाळेच्या प्राचार्य कविता जगताप म्हणाल्या येत्या २२ ऑक्टोबर रोजी कन्या शाळा सातारा शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे . या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष रविंद्र देव, उपाध्यक्ष विद्या कुलकर्णी व सचिव पी व्ही एस शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . शताब्दी शुभारंभाचा मुख्य कार्यक्रम कन्या शाळेच्या प्रांगणात शुक्रवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संस्थेच्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे . शताब्दी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुणे येथील महर्षी कर्वे यांच्या स्मारकापासून एक क्रीडा ज्योत आणण्यात येणार आहे . दुपारी ४ वाजता पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शाळेचे खेळाडू ही ज्योत कन्या शाळेच्या प्रांगणात पोहचविणार आहेत, अशी माहिती शाळा पर्यवेक्षक चंद्रकांत ढाणे यांनी दिली