कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना वाईत मिळाला ‘नाथ’

    वाई : कोरोनामुळे आई वडिलांचा मृत्यू झाल्याने वाई तालुक्यातील अनेक बालके अनाथ झाली आहेत. त्यांच्या जीवनमरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना सामाजिक कार्यकर्ते वाईभूषण स्व. पोपटलाल ओसवाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरोनामुळे आई वडिलांचे छत्र गमावलेल्या अनाथ मुला-मुलींना दत्तक घेऊन त्यांचा बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च स्व. दिनेश ओसवाल स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक दीपक ओसवाल यांनी दिली.

    स्व. पोपटलाल ओसवाल यांनी श्री करुणा मंदिर गोशाळा आणि स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचे उचित स्मरण होण्याच्या दृष्टीने अनाथांना आधार देण्याचा निर्णय घेतल्याचे ओसवाल यांनी सांगितले. स्व. पोपटलाल ओसवाल यांनी आयुष्यभर भगवान महावीर यांचा ‘जिओ और जिने दो’ हा मूलमंत्र जपत गरजूंना मदत करण्यासाठी कायमच पुढाकार घेतला होता. महाबळेश्‍वर तालुक्यातील दुर्गम कांदाटी खोरे तसेच वाई तालुक्याच्या पश्‍चिम भागातील प्रत्येक गावात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे काम स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठानच्या वतीने नित्यनियमाने सुरू होते. याच प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी नेत्रचिकित्सा शिबिरे भरवून अनेकांना दृष्टी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पोपटलाल ओसवाल यांनी अविरतपणे सुरू ठेवले होते. स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठानने नेत्रतपासणीसाठी वाईत कायमस्वरुपी केंद्राची स्थापना केलेली असून देसाई नेत्ररुग्णालयाच्या मदतीने पुण्यात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे काम येथे आजही सुरूच आहे.

    वेळे, ता. वाई येथे श्री करुणा मंदिर गोशाळेची स्थापना करून तेथे कसाईखान्यात नेण्यात येणाऱ्या भाकड गाईंचा सांभाळ करण्याचे कार्य पोपटलाल ओसवाल यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले होते. या गोशाळेत सध्या सुमारे ६०० गायींचा सांभाळ केला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी गावोगावी ‘मोबाईल सायन्स लॅब’ उपक्रम त्यांनी सुरू केला होता. भारत विकास परिषदेच्या माध्यमातूनही वाई शहर आणि तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यास त्यांनी सुरूवात केली होती.
    अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पालकत्व त्यांनी घेतले होते.

    निरपेक्ष सामाजिक कार्य हा त्यांचा आत्मा होता. अनेकांना त्यांनी समाजकार्यात जोड़ून घेतले होते. गेली पाचसहा दशकं मित्रांच्या सोबतीने त्यांनी एक मोठी सामाजिक चळवळ उभी केली होती. आपल्या समाजनिष्ठ कार्यातून त्यांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या अकस्मात निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या सामाजिक कार्याचा मार्ग अविरतपणे सुरू ठेवून त्यांचे उचित स्मरण करण्यात येणार असल्याचे दीपक ओसवाल यांनी यावेळी सांगितले.