माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे बिगूल वाजले; राजकीय घडामोडींना येणार वेग

    दहिवडी : बहुचर्चित माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून, ७ ऑगस्टला मतदान तर ८ ऑगस्टला निकाल लागणार आहे. बाजार समितीच्या अनुषंगाने बैठकांना सुरुवात झाली असताना एक निवडणूक कार्यक्रम समाज माध्यमातून पसरविण्यात आला होता. मात्र, तो अधिकृत नव्हता. तारखेत एक दिवसाचा बदल करुन आज अधिकृतरित्या कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

    ६ जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ६ जुलै सकाळी अकरापासून १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करता येतील. १३ जुलै रोजी सकाळी ११ पासून अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर वैध अर्जांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येईल. १४ जुलै सकाळी ११ वाजल्यापासून २८ जुलै दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेता येतील.

    २९ जुलै सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करुन चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदानाचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.