माणमधील बळीराजाला वरुणराजाची प्रतिक्षा…

    वावरहिरे : माण तालुक्याच्या उत्तर भागातील वावरहिरे, थदाळे, शिंगणापूर, मोहि, डंगिरेवाडी, दानवलेवाडी, सोकासन या परिसरात यंदा सर्वत्र पावसाने दांडी मारल्याने शेतकरी व मजूरवर्ग चिंता व्यक्त करत आहे. सुरुवातीला या भागात हलक्या पावसाच्या सरी झाल्याने खरिप हंगामातील बाजरी, मका, मूग, चवळी, मटकी, भुईमुग या पिकांची अल्पशा पावसावरच शेतकऱ्यांनी महागड्या बि-बियाणांच्या कमी अधिक प्रमाणात पेरण्या उरकून घेतल्या.

    आता पावसाने दांडी मारल्याने येथील शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. मान्सूनपूर्व पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मृगाचा पाऊस वेळेवर पडेल आणि पेरण्या वेळेवर होणार असा अंदाज शेतकऱ्यांनी लावला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पतसंस्था, सरकारी बँका, सोसायटी यांच्यामार्फत तसेच हात उसने पैसे घेऊन खत बियाणे घेऊन पेरणीची तयारी केली. तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर साह्याने तर काही शेतकऱ्यांनी बैलजोडीच्या मदतीने चाड्यावर मूठ आवळली.

    अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पेरणी टोपली असून, बहुभुधारक शेतकर्यांची पेरणी सुरुच आहे. काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केल्याने बियाणे उगवले आहे. मात्र, परिसरात आठ दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे पावसाअभावी पिके करपून जात आहेत. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याने शेतकरी हलावदिल झाला आहे. यावर्षी हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज फोल ठरला. या आठवड्याभरात चांगला पाऊस नाही आला तर शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

    आतापर्यंत चांगला पाउस हवा होता तो आलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा नजरा आता आभाळाकडे लागून आहेत. जून महिना संपूनही पाहिजे तसा पाऊस न सल्ल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. पाऊस नसल्याने वातावरणात अद्याप उष्णता टिकून आहे. त्यामुळे पावसाची सगळीकडे जनता आतुरतेने वाट पाहत आहे. दररोज ढगाळ वातावरण तयार होते. त्यामुळे पाऊस आज येईल उद्या येईल या आशेवर येथील शेतकरी आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्था पसरलेली दिसून येते.