शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करावी : प्रदीप विधाते

    वडूज : सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात परिस्थिती अवघड झाली असताना शेतकऱ्यांना मात्र अशा परिस्थितीत उपजीविका चालवण्यासाठी शेतीमध्ये कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. ऋतुमान व हवामान अंदाज घेऊन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर
    शेतकऱ्यांनी शेती केली तर निश्चितच फायदेशीर ठरेल, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप आण्णा विधाते यांनी वडूज येथे सांगितले.

    कै. वसंतराव नाईक जयंती व महाराष्ट्र कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती खटाव(वडूज)येथील पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वृक्ष लागवड व शेतकरी सन्मान” कार्यक्रमात प्रदीप विधाते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम, उपसभापती हिराचंद पवार, माजी सभापती संदीप मांडवे, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहा.गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, तालुका कृषी अधिकारी आर एस जीतकर, पंचायत समिती कृषी अधिकारी श्रीकांत गोसावी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी पंचायत समिती आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर शेतकरी सन्मान कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी जीतकर यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांच्या कार्य व महाराष्ट्र दिनाचा सविस्तर आढावा सांगितला. पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२०-२१ खरीप हंगाम बाजरी पीक स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या प्रथम चार तर बायोगॅस प्रकल्पातील लाभार्थी, उद्दिष्ट पूर्ण करणारे ग्रामसेवक, कर्मचारी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेतील राज्यस्तरावर हरभरा पिकांमध्ये प्रथम आलेले कै. वसंत पांडुरंग कचरे, विभाग स्तरावर प्रथम आलेले आनंदराव उत्तम घाडगे, भानुदास जाधव आदी सुमारे १३ पेक्षा जास्त विविध पीक स्पर्धेत यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

    तसेच कृषी सहायक पवार यांचाही उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी विस्तार अधिकारी गौड, मायणी मंडल कृषी अधिकारी दाभाडे, माने, आदींची उपस्थिती होती.