शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरून करावा : प्रदीप विधाते

ऋतुमान व हवामान अंदाज घेऊन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर शेतकऱ्यांनी शेती केली तर निश्चितच फायदेशीर ठरेल, असं मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी वडूज येथे व्यक्त केले.

    वडूज : सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात परिस्थिती अवघड झाली असताना शेतकऱ्यांना उपजीविका चालवण्यासाठी शेतीमध्ये कष्ट केल्या शिवाय पर्याय नाही. ऋतुमान व हवामान अंदाज घेऊन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर शेतकऱ्यांनी शेती केली तर निश्चितच फायदेशीर ठरेल, असं मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी वडूज येथे व्यक्त केले.

    पंचायत समिती आवारात वृक्षारोपण
    कै. वसंतराव नाईक जयंती व महाराष्ट्र कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती खटाव (वडूज) येथील पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वृक्ष लागवड व शेतकरी सन्मान’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम, उपसभापती हिराचंद पवार, माजी सभापती संदीप मांडवे, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, तालुका कृषी अधिकारी आर. एस. जीतकर, पंचायत समिती कृषी अधिकारी श्रीकांत गोसावी आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी पंचायत समिती आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शेतकरी सन्मान कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी जीतकर यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांती चे प्रणेते कै वसंतराव नाईक यांच्या कार्य व महाराष्ट्र दिनाचा सविस्तर आढावा घेतला.

    पीक स्पर्धेतील शेतकऱ्यांचा सन्मान
    पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२०-२०२१ खरीप हंगाम बाजरी पीक स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या प्रथम चार तर बायोगॅस प्रकल्पातील लाभार्थी, उद्दिष्ट पूर्ण करणारे ग्रामसेवक, कर्मचारी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेतील राज्यस्तरावर हरभरा पिकांमध्ये प्रथम आलेले कै. वसंत पांडुरंग कचरे, विभाग स्तरावर प्रथम आलेले आनंदराव उत्तम घाडगे, भानुदास जाधव, आदी सुमारे १३ हुन अधिक विविध पीक स्पर्धेत यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कृषी सहायक पवार यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी विस्तार अधिकारी गौड, मायणी मंडल कृषी अधिकारी दाभाडे, माने उपस्थिती होते.