सहकारमंत्र्यांच्या पुतणीला सासरच्यांकडून शिवीगाळ करून मारहाण; एक कोटीचीही मागणी

फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे अशाप्रकारच्या विविध कलमान्वये संशयितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सातारा : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व विद्यमान आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील (Pandurang Patil) उर्फ पी. एन. पाटील यांच्यासह मुलगा व मुलीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेला शिवीगाळ करून मारहाण करत एक कोटीची मागणी केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद आदिती राजेश पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

    पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन. पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील व नणंद टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. आदिती राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पती, सासरे व नणंद यांनी संगनमत करुन विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला आहे. तसेच फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे अशाप्रकारच्या विविध कलमान्वये संशयितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

    कराड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या आदिती पाटील या आपले वडिल सुभाष पांडुरंग पाटील (रा. वाखाण रोड, कराड) या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.