सातारा एसटी बसस्थानकामध्ये अग्नितांडव ; पाच शिवशाही बस आगीत जळून खाक

बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान एका शिवशाही बसमधून अचानक आगीचे लोट येऊ लागले . बघता बघता आग इतकी झपाटयाने पसरली की लगतच्या चार शिवशाही बसेस धडाधड पेटल्या . मोबाईलमध्ये आगीचे चित्रण करणाऱ्या बघ्यांची गर्दी जमून प्रवाशांची सुद्धा धावपळ सुरू झाली.

  • अल्पवयीन मतिमंद मुलाने सिगारेटने पेटवले पडदे
  • एक कोटी रूपयांचे झाले नुकसान

सातारा : सातारा मध्यवर्ती बस स्थानकामध्ये अल्पवयीन मतिमंद मुलाने सिगारेटने पडदे पेटविल्याने आगार परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसला आग लागून तब्बल पाच बस जागीच्या भक्ष्यस्थानी पडल्या . या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . या आगीमुळे संबंधित बस कंपनीचे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

भागीरथी कंपनीच्या शिवशाही बस एकूण देखभालीच्या दृष्टीने पांढरा हत्ती ठरल्या असल्याने सातारा मध्यवर्ती आगाराने त्या रूटवरून काढून त्या आगाराच्या आवारात उभ्या केल्या आहेत . बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान एका शिवशाही बसमधून अचानक आगीचे लोट येऊ लागले. बघता बघता आग इतकी झपाटयाने पसरली की लगतच्या चार शिवशाही बसेस धडाधड पेटल्या. मोबाईलमध्ये आगीचे चित्रण करणाऱ्या बघ्यांची गर्दी जमून प्रवाशांची सुद्धा धावपळ सुरू झाली.

सुमारे अर्धा ते पाऊण तास धगधगणाऱ्या आगीचे तांडव सुरूच होते. घटनेनंतर पंधरा मिनिटातच सातारा पालिकेचा अग्निशमन बंब तेथे दाखल झाला आणि आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले . आगार व्यवस्थापक एस. एस. गाडेकर व कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रे आणून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला.

बचाव यंत्रणेला बघ्यांच्या गर्दीचा वारंवार अडथळा येत होता. अग्निशमन दलाच्या बंबातील पाणी संपल्याने मोठी अडचण झाली. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीची मदत मिळवत आग आटोक्यात आणली. पाच शिवशाही गाड्यांची आसने व इतर सुविधा जळून तब्बल एक कोटी रूपयांचे नुकसान झाले अशी माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.

दरम्यान या अग्नी तांडवाला जवाबदार असणाऱ्या अल्पवयीन मुलाला आगाराच्या काही कर्मचाऱ्यांनी पकडून नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले . हा मुलगा मतिमंद असल्याची माहिती समोर येत असून त्यानेच सिगारेटने शिवशाही बसचे आतील खिडक्यांचे पडदे पेटवल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा शहर पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत असून त्या मुलाची अधिक चौकशी सुरू आहे. तो मुलगा शिवशाही बसमध्ये कसा पोहोचला ? बसचे दरवाजे लॉक का नव्हते असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.