कास पठार, सातारा
कास पठार, सातारा

  • लाॅकडाउनमुळे कास पठारावरील पुष्पसौंदर्याला पर्यटक मुकणार

सातारा (Satara):  वाईतील कास पठारावरील फुललेल्या रंगबिरंगी फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटन सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सातारा जिल्ह्यात दाखल होतात; मात्र, यंदा कास पठाराचे सौंदर्य पाहण्याचा योग पर्यटकांच्या नशिबात नाही. कारण, स्थानिक प्रशासनाने कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता कास पठाराचे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित केले आहे.

उन्हाळ्यात कास पठारावरील वाळलेल्या गवताच्या कुरणाला पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या की, पालवी फुटते. काही महिन्यातच संपूर्ण पठार विविध प्रजातींच्या फुलांनी बहरून येतो. नैसर्गिक रंगांची मनसोक्त उधळण असलेली नानाविध फुले वाऱ्यासोबत डोलू लागतात. पाऊस संपला आणि कोहळे ऊन फुलांवर पडू लागले की, ते सौंदर्य काही वेगळेच भासते. त्याच्या सोबतीला विविध प्रजातींचे पक्षी, कीटक, फुलपाखरे, रंगबिरंगी सरडे, या पठारांवर आढळतात. यंदा राज्यातील सर्वच पर्यटनस्थळे बंद असल्याने काठ पठारावर कोणीही पर्यटक नाही. दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत साताऱ्यातील कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. यातून ग्रामीण लोकांनाही मोठा रोजगार मिळतो; पण यंदा पर्यटकांविना स्थानिकांचेही आर्थिक नुकसान होत आहे.