फेरीवाल्यांच्या अनुदान प्रश्नावरून माजी उपनगराध्यक्षांचा आंदोलनाचा इशारा

    सातारा : सातारा शहरातील 586 फेरीवाल्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातारा पालिकेने फेरीवाल्यांसाठी जाहीर केलेले अनुदान तत्काळ देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगर विकास आघाडीचे नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी दिला आहे .

    या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कदम यांनी म्हटले की, कोरोना महामारीच्या संकटामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाचे जगणे अवघड झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संक्रमण साथ उद्भवल्यास नगरपालिका अधिनियम 1965 च्या 237 नियम 247 प्रमाणे विहित निकषानुसार ठरावाच्या मान्यतेने फेरीवाल्यांना रोजगारांसाठी अनुदान देणे बंधनकारक आहे. सहा महिन्यांपूर्वी सत्ताधारी सातारा विकास आघाडीने फेरीवाल्यांना पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप शहरातील नोंदणीकृत 586 फेरीवाल्यांना अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले नाही.

    या फेरीवाल्यांचे आवश्यक कागदपत्रे जमा करून त्यांना तत्काळ अनुदान द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कदम यांनी दिला. याशिवाय फेरीवाल्यांप्रमाणे रिक्षावाले, हमाल, धुणी भांडी करणाऱ्या गरजू महिला यांनाही या प्रकाराचे अनुदान देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली.