जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांचे निधन

    सातारा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पुस्तकांचे गाव असणाऱ्या भिलारचे सुपुत्र बाळासाहेब भिलारे (वय ७२) (Balasaheb Bhilare) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी सकाळी निधन झाले.

    गेल्या काही दिवसांपासून भिलारे यांची प्रकृती अस्वस्थ होती. दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा भिलार येथील आपल्या निवासस्थानी पुन्हा विश्रांतीसाठी परतले होते. मात्र, रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने सातारा जिल्ह्यावर दुःखाची छाया पसरली आहे.

    महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रवादीची मजबूत मोट बांधणारे बाळासाहेब भिलारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. दिवंगत माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणाऱ्या बाळासाहेबांनी तळागाळातील कार्यकर्ते गोळा करून राष्ट्रवादीचे संघटन मजबूत केले. भिलार जिल्हा परिषद गटाचे त्यांनी तब्बल तीस वर्ष प्रतिनिधित्व केले तसेच उत्तम संघटनाच्या बळावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी पार पाडताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी कायम वाचा फोडली.

    महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्याला शेतमालासाठी राष्ट्रीय कृषी व्यासपीठ मिळावे म्हणून बाळासाहेब भिलारे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला स्ट्रॉबेरी फेस्टिवल हा प्रयोग भलताच यशस्वी झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलारे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. बाळासाहेब भिलारे यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता हरपला ही पोकळी कधीच भरून येणार नाही, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.