खटाव येथे बैलगाडी शर्यत आयोजन प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

खटाव येथील हुसेनपूर भागात बैलगाड्यांच्या शर्यतींचे आयोजन होत असल्याची गोपनिय माहिती पुसेगाव पोलिस ठाण्याला मिळालेली होती. बैलगाड्या शर्यतींचे आयोजन होऊ नये यासाठी तेथील जमिन मालकांना पुसेगाव पोलिस ठाण्यातर्फे नोटीसाही देण्यात आल्या होत्या.

    पुसेगाव : हुसेनपूर (खटाव) येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल शर्यतीचे आयोजक गोरख शंकर बोर्गे (रा. खटाव) व इतर तीन ते चार बैलगाडी चालक-मालक यांच्यावर भारतीय दंडसंहिता व प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत पोलिसांनी सांगितले, खटाव येथील हुसेनपूर भागात बैलगाड्यांच्या शर्यतींचे आयोजन होत असल्याची गोपनिय माहिती पुसेगाव पोलिस ठाण्याला मिळालेली होती. बैलगाड्या शर्यतींचे आयोजन होऊ नये यासाठी तेथील जमिन मालकांना पुसेगाव पोलिस ठाण्यातर्फे नोटीसाही देण्यात आल्या होत्या. तरीही रविवारी (ता. १८) खटाव गावच्या हद्दीत हुसेनपूर शिवारात बैलगाड्या शर्यती घेण्यात आल्याची माहिती मिळाल्याने या शर्यतींचे आयोजक गोरख शंकर बोर्गे व इतर तीन ते चार जणांवर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सुधाकर भोसले हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दरम्यान पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात होणाऱ्या बैलगाड्या शर्यंतींच्या आयोजकांवर तसेच चालक व मालक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून ग्रामस्थांनी आपल्या गावातील व भागातील शर्यतींची माहिती पुसेगाव पोलिस ठाण्यात कळवावी, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांनी केले आहे.