पालिकेच्या चतुर्थ वार्षिक पाहणीला अखेर मुहूर्त

22 लिपिक सोमवारपासून मालमत्ता मूल्यांकनाच्या मोहिमेवर

  सातारा : सातारा शहर आणि नव्याने हद्दीत आलेल्या रहिवासी क्षेत्रातील सुमारे 70 हजार मिळकतींची 2021-25 या वर्षातील चतुर्थ वार्षिक पाहणी सोमवारपासून सुरू होत आहे. वसुली विभागाकडून येत्या सोमवारपासून वसुली लिपिकांना ऑर्डर दिल्या जाणार असून, प्रत्यक्ष मालमत्ता मूल्यांकनाच्या कामाला गती दिली जाणार आहे.

  घरपट्टीचा दर निश्चित करणारी चतुर्थ वार्षिक पाहणी आणि या मोहिमेत शहराच्या हद्दीतील नव्याने उभ्या राहणाऱ्या मिळकतींचे मूल्यांकन प्रक्रिया पालिकेच्या महसूल वृध्दीसाठी अत्यंत आवश्यक असते. सातारा पालिकेची चतुर्थ वार्षिक पाहणी 2018 पासून तब्बल तीन वर्ष राजकीय कारणांमुळे लांबणीवर पडली होती. मात्र, पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी चतुर्थ वार्षिक पाहणीची जाहीर नोटीस प्रसिद्ध करून या प्रक्रियेला गती दिली आहे.

  शहराच्या हद्दवाढीपूर्वी वसुली विभागाच्या नोंदीनुसार 33 हजार मिळकती होत्या. खेड विलासपूर शाहूपुरी शाहूनगर दरे खुर्द या भागाची 61 हजार लोकसंख्या आणि 37 हजार मिळकती आता सातारा पालिकेच्या हद्दीत आल्या आहेत. पालिका कार्यक्षेत्रातील मिळकतींची पाहणी (चटई क्षेत्रानुसार) पाहणी करणे, प्रत्यक्ष क्षेत्राची मोजणी, बांधणी तील बदल, निवासी बिगर निवासी यांचे वर्गीकरण करून नवीन मिळकतींच्या नोंदणी करणे आणि त्या पाहणी पत्रकात नोंदविण्याचे काम या पाहणी प्रक्रियेत होते.

  सातारा पालिकेला दरवषी घरपट्टीच्या रूपाने साधारण 17 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आता मिळकती वाढल्यामुळे प्रत्यक्ष महसूलातही वाढ होणार आहे. वसुली विभागाचे अधीक्षक प्रशांत खटावकर यांनी या चतुर्थ वार्षिक पाहणीच्या प्रक्रियेसाठी बावीस लिपिकांना मोहिमेवर पाठविण्याचे नियोजन केले आहे. ही प्रक्रिया साधारण दीड महिना चालणार असून, प्रत्यक्ष पाहणी, पाहणी पत्रकांच्या नोंदीचे निर्धारण, त्रिदस्यीय समितीकडे अपिलांच्या माध्यमातून सुनावणी, त्यानंतर समितीचा अहवाल व त्यानंतर घरपट्टी दराची निश्चिती अशी प्रक्रिया राबविली जाणार आहे.

  एकूण मिळकती – 70 हजार

  हद्दवाढीनंतरच्या मिळकती- 33988

  लिपिक संख्या -22

  अंदाजे महसूल – 34 कोटी

  बिगरनिवासी मिळकतीतून अपेक्षित उत्पन्न – 14 कोटी