माण तालुक्यातील महिलांसाठी मोफत लसीकरण : चेतना सिन्हा

    म्हसवड : म्हसवड येथील माणदेशी फौंडेशन म्हसवड व बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत कोविड 19 लसीकरण शिबिर आयोजित करण्यात येत आहे. ७, ८, ९ व १० जुलै २०२१ रोजी होणाऱ्या या लसीकरणाचा फायदा सर्व माण तालुक्यातील महिलांनी घ्यावा, असे आवाहन माणदेशी फौंडेशन संस्थेच्या चेतना सिन्हा यांनी केले आहे. हे लसीकरण म्हसवड येथील माणदेशी फौंडेशनच्या कार्यालयात दिली जाणार आहे.

    कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंब उधवस्त झाली असून, अनेकांनी आपले प्राणही गमावले असताना सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून छोटीसा खारीचा वाटा म्हणून माणदेशी संस्थेने हजारो गरीब कुटुंबाना शिधा वाटप, पीपीई किट, मोफत जेवण तसेच महिलांना रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठीच्या गोळ्या सुद्धा पुरवण्यात आल्या. सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीन हजार N95 मास्क व दोन हजार लिटर सॅनिटायझर देण्यात आले.

    गोंदवले बुद्रुक येथे माण तालुक्यात पहिले सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारले. त्याचा बहुरुग्णांना फायदा झाला. आज शासन स्तरावर लसीकरण सुरु असून, त्यामध्ये शासनाला मदत व्हावी या हेतूने ही लस दिली जाणार आहे. अपुऱ्या लस उपलब्ध होत असल्याने महिला वर्गाला ताटखळत बसावे लागत आहे. शिवाय दिवसभर थांबून शेवटी घरी परतावे लागत असल्याने माणदेशी फाँडेशन संस्थेच्या चेतना सिन्हा यांनी महिलांसाठी मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्याचे ठरविले व यासाठी बेल-एअर हॉस्पिटल, पाचगणी यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले.

    ७ जुलैपासून सुरु होत असलेल्या मोफत शिबिरास समस्त माणदेशी महिलांनी मोठ्या संख्येने साहभाग घ्यावा, असे आवाहन चेतना सिन्हा यांनी केले आहे. ज्या महिलांनी अद्याप पहिली लस घेतली नसेल. त्यांनी आपले नाव नोंदणी माणदेशी फौंडेशन संस्थेकडे करावी. त्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा. वनिता पिसे ९४२१२१२०७३, योगिता झिमल ९७६७७९७१२८, शाहीन मुलाणी ९९७५१३३४००, लता जाधव ८००७९८५२९९.

    मोफत लसीकरण शिबिर हे एकूण सलग चार दिवस चालणार असून, सीरम इन्स्टिट्यूट पुणे यांची लस सुरक्षित व शासन प्रमाणित आहे. ही लस माणदेशी संस्थेच्या मुख्य कार्यालयात मान्यताप्राप्त डॉक्टरांच्या उपस्थितीत दिली जाणार आहे.

    दररोज साडेसातशे महिलांना लस देणार 

    लसीकरणासाठी गर्दी होऊ नये व लस सर्वांनाच मिळावी यासाठी दररोज साडेसातशे महिलांना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी माणदेशी फौंडेशनने प्रत्येकाला वेळ व वार ठरवून दिला आहे. तर एकावेळी ४ टेबल लसीसाठी तयार ठेवण्यात येणार आहेत.