माणदेशी फौंडेशनमुळे हजारो महिलांचे मोफत लसीकरण

  म्हसवड : माणदेशी फौंडेशनने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवून जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला. कोरोनामुक्तीसाठीही माणदेशी फौंडेशनने लढा उभारला असून, आजवर या फौंडेशनच्या वतीने सर्वांना मोफत मास्क, सॅनिटायझर, रुग्णांना ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन मशीन, दोनवेळचे जेवण, चहा नाश्ता व सकस पौष्टिक आहार मोफत दिला आहे. तर या सर्वासोबतच म्हसवडसह परिसरातील सर्व महिलांना कोरोना प्रतिबंधित लस मोफत उपलब्ध करुन दिली. या लसीमुळे हजारो महिलांना कोरोना प्रतिबंधित लस घेता आली आहे.

  एकीकडे शासनस्तरावरुन कोरोना प्रतिबंधित लसीकरण सुरु आहे. मात्र, येणाऱ्या लसीचे प्रमाण हे अत्यल्प असल्याने सर्वांना लस मिळणे अशक्य आहे. लसीसाठी नागरीक पहाटेपासुनच आरोग्य केंद्राबाहेर रांगा लावत असल्याचे दृष्य आहे ह्या रांगा पाहुन महिलांना लस कशी व कधी मिळणार याचा सखोल विचार करुन माणदेशीच्या सर्वेसर्वा श्रीमती चेतना सिन्हा यांनी फौंडेशनच्या वतीने सर्व महिलांना मोफत लस देण्याचा निर्णय घेत त्यादृष्टीने हालचाल सुरु केली अन एका झटक्यात सुमारे ३ हजार लस महिलांसाठी उपलब्ध ही केली, त्या लसीकरणाचा शुभारंभ म्हसवड येथील माणदेशी फौंडेशनच्या मुख्य कार्यालयात आयोजित करुन महिलांचे लसीकरण सुरु केले आहे. हे लसीकरण ४ दिवस सुरु राहणार असून, शहरातील प्रत्येक महिलेला ही लस मिळावी, असा प्रयत्न फौंडेशनच्या वतीने केले जात आहे. या व्यतिरीक्त माणदेशी महिला बँकेच्या सर्व शाखा अंतर्गत महिलांचे लसीकरण केले जाणार आहे.

  माणदेशी फौंडेशनने घेतलेल्या या निर्णयामुळे महिलावर्गात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असुन आमची कोणीतरी काळजी घेणारे आहे असा आत्मविश्वास प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर दिसुन येत आहे. तर माणदेशीच्या या उपक्रमाचे जिल्हाधिकारी यांनीही कौतुक केले असुन फौंडेशनच्या या उपक्रमामुळे शासनाच्या लसीकरणालाही मोठी मदत होत असल्याच्या भावना आरोग्य विभागाकडुन व्यक्त होत आहेत.

  दरम्यान, माणदेशी फौंडेशनने आयोजित केलेल्या लसीकरणासाठी म्हसवडसह परिसरातील महिलांनी हजेरी लावली होती.

  नियोजनबद्ध कार्यक्रम

  माणदेशी फौंडेशनने आयोजित केलेल्या महिला कोव्हीड १९ च्या लसीकरणासाठी आलेल्या महिलांची येण्या- जाण्याची सोय मोफत करण्यात आली होती. याशिवाय येणाऱ्या प्रत्येक महिलेला लस दिल्यानंतर त्या महिलेला बिस्किट, पाणी व औषधे दिली जात होती यासाठी माणदेशीचा प्रत्येक कर्मचारी योग्य ती काळजी घेत होता.

  लस घेतलेल्या प्रत्येक महिलेला एक झाड 

  माणदेशी फौंडेशनने आयोजित केलेल्या या वसीकरणात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला लस दिल्यानंतर एक झाड दिले जात होते, तर ते झाड जगवण्याचाही त्यांच्याकडुन संकल्प करुन घेतला जात होता.

  सलग ४ दिवस चालणार लसीकरण

  म्हसवडसह परिसरातील सर्व महिलांचे लसीकरण व्हावे याकरीता माणदेशी फौंडेशनने हा उपक्रम सुरु केला असुन दररोज साडेसातशे महिलांना ही लस दिली जाणार आहे. पुढील ४ दिवस हा उपक्रम सुरु राहणार असुन या उपक्रमातुन सर्व महिलांचे लसीकरण होणार आहे.

  लसीकरणातुन शासनाला मदत 

  सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये सर्वात कमी लसीकरण झाले आहे. त्यामुळे अनेक महिलांचे लसीकरण होवु शकले नाही. प्रत्येक महिला ही त्या कुटुंबाची प्रमुख आहे ती सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आहे. त्यामुळे महिलांना लस देण्याचा आमच्या फौंडेशनने निर्णय घेत तसे लसीकरण सुरु केले आहे. यामुळे शासनाला एकप्रकारे मदत झाली आहे.

  – चेतना सिन्हा, अध्यक्षा, माणदेशी फौंडेशन – म्हसवड.

  लसीसोबत महिलांनी वृक्षाचीही जोपासना करावी

  ज्या महिलांना कोव्हीड १९ ची लस दिली जात आहे त्या प्रत्येक महिलेला एक झाड दिले जात आहे, कोरोनामुळे ऑक्सीजनचा तुटवडा कसा निर्माण होते. हे या पुर्वी स्पष्ट झाले आहे, भविष्यात ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण होवु नये याकरीता प्रत्येकाने किमान एक झाड लावले पाहिजे व ते जोपासले पाहिजे.

  – रेखा कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, माणदेशी फौंडेशन – म्हसवड.