आटकेतील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाशिराव गुरुजी यांचे १०० व्या वर्षी निधन

1942 च्या स्वातंत्र्य संग्राम लढ्यात क्रांतिसिह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुफान सैनिक सेना व राष्ट्रीय सेवा दलात गुरुजी कार्यरत होते.

    कराड : आटके, (ता. कराड), येथील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक ह. भ. प. पैलवान यशवंत श्रीपती पाटील (बाशिराव गुरुजी) (Bashirao Guruji) यांचे 100 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 1942 च्या स्वातंत्र्य संग्राम लढ्यात क्रांतिसिह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुफान सैनिक सेना व राष्ट्रीय सेवा दलात गुरुजी कार्यरत होते. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्यामुळे त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांना पुणे येथील येरवडा व नाशिक येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते.

    त्याकाळी आटके परिसरात बाशिराव पैलवान म्हणून ते प्रसिध्द होते. त्यांनी 25 वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून शेरे व आटके येथील काम पहिले. त्यांची सात्विक वृत्ती असल्यामुळे सेवानिवृत्ती नंतर ते हरिभाक्तिमध्ये दंग झाले. त्यांनी शेवटपर्यंत पंढरपूरची दर महिन्याचीवारी नियमितपणे केली.

    आटके येथील संत मुकुंद महाराज व दत्तू बुआ यांचे ते निस्सिम भक्त होते. त्यांनी सुसंस्कारीत भावी पिढी घडवली. त्यांचा हरिभाक्तीचा वारसा जेष्ठ चिरंजीव सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जगन्नाथ पाटील हे चालवत आहेत. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना,नातवंडे आणि परंतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेला स्वातंत्र्य सैनिकास मुकावे लागले. या भावनेने परिसरात हळहळ वक्त होत आहे.