गवडीच्या तोतया रॉ एजंटची पोलिसांकडून उचल बांगडी

युवकाच्या अंगावर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेश होता. त्यांनाही संशय आला की, आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे नवीन कोण फिरत आहे. म्हणून त्यांनी त्या दुचाकीचा पाठलाग केला. युवकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दुचाकी देवकल गावाच्या हद्दीत अडवली. कोणत्या विभागाचे अधिकारी अशी विचारणा सुजीत भोसले व नितीराज थोरात यांनी करताच मी ‘रॉ’चा एजंट आहे.

    सातारा: मी ‘रॉ’चा एजंट आहे. थेट भरती दिल्लीत होत असते. सहज फिरायला आलो आहे, अशी बतावणी करणाऱ्या सातारा तालुक्यातील गवडी येथील नयन राजेंद्र घोरपडे या युवकाची सातारा तालुका पोलिसांनी उचलबांगडी केली. त्याच्या खोट्या वर्दीची वरात कासवरच्या देवकल गावापासून तालुका पोलीस ठाण्यापर्यंत काढली. नयन याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी केले आहे.

    याबाबत सातारा तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महाशिवरात्रीच्या दिवशी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पथक कास रस्त्यावर गस्त घालत होते. त्याच दरम्यान, पथकाचे डीबीचे सुजीत भोसले, नितीराज थोरात यांना दोन युवक दुचाकीवरुन गेलेले दिसले. त्यातील एका युवकाच्या अंगावर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेश होता. त्यांनाही संशय आला की, आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे नवीन कोण फिरत आहे. म्हणून त्यांनी त्या दुचाकीचा पाठलाग केला. युवकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दुचाकी देवकल गावाच्या हद्दीत अडवली. कोणत्या विभागाचे अधिकारी अशी विचारणा सुजीत भोसले व नितीराज थोरात यांनी करताच मी ‘रॉ’चा एजंट आहे. अधिक माहिती मला देता येत नाही, असे उत्तर दिल्यानंतर सुजित भोसले यांचा आणखी संशय बळवताच त्यांनी त्या तोतयास तालुका पोलीस ठाण्यात चौकशीला यावे लागेल, असे सांगत पोलीस ठाण्यात आणले.

    पोलीस निरीक्षक हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने चौकशी केली असता त्याचा ‘रॉ’शी काहीही संबंध नव्हता. तरीही त्याने पोलीस अधिकाऱ्यांचा वेश परिधान करुन फिरत होता. तसेच त्याच्या गावातही ‘रॉ’च्या विभागात नोकरीला असल्याचे सांगितले होते. यावरुन सुजित भोसले यांनी तालुका पोलीस ठाण्यात नयन घोरपडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली. त्याचा तपास पोलीस नाईक महेंद्र पाटोळे हे करत आहेत.