अबब! परदेश दौऱ्यासाठी चक्क वीस लाख रुपयांची तरतूद ; सातारा जिल्हा परिषदेच्या पुरवणी बजेटला मंजुरी

बजेटमध्ये पुरामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. त्याकरता काहीच तरतूद न केल्याची बाब उदयसिंह उंडाळकर यांनी निदर्शनास आणून दिली. अनेकांच्या मोटरी वाहून गेल्या आहेत. अनेकांच्या बुडाल्या आहेत. त्यांना काहीतरी मदतीची तरतुद करायला हवी असा मुद्दा त्यांनी मांडला. भिमराव पाटील यांनी गेल्या अडीच वर्षात काहीच तरतूद करण्यात आलेली नाही, असा आरोप केला.

  सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे २०२१-२२चे स्वनिधीचे पुरवणी अंदाजपत्रक अपेक्षित जमा रक्कम २५ कोटी ५४ लाख व पुरवणी अंदाजपत्रकाकरता शिल्लक ४६ कोटी ४६ लाख अशी एकूण ७२ कोटी असून त्यापैकी मुळ ४० कोटी ९९ लाख आणि पुरवणी रक्कम ३१ कोटी अशी एकुण ७१.९९ कोटी महसूली खर्चाचे बजेट प्रस्तावित केले आहे. जिल्हा परिषदेचे पुरवणी अंदाजपत्रक १ कोटी शिल्लकीचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी मांडले. या बजेटमध्ये विविध समित्यांच्या दौऱयासाठी तरतुद केल्याने मानकुमरे मात्र खवळले. येथे कोरोनाने माणसं पटापट मरत आहेत आणि झेडपीचे सदस्य परदेश दौऱयाला. दौऱयाऐवजी तोच २० लाखाचा निधी सेस फंडाकरता वळवला असता तर अधिक चांगले झाले असते. या मुद्यावरुन मानकुमरे यांनाच केंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला.

  जिल्हा परिषदेच्या सभेत पुरवणी बजेट मांडण्यात आले. वसंतराव मानकुमरे यांनी या बजेटबाबत मत मांडताना मानसिंगराव जगदाळे यांनी बजेट सुंदर मांडलं. परंतु ते उठून मांडायला हवे होते. केंद्रीय अर्थमंत्री सुद्धा उठून मांडतात, असा दाखला देत कृषी सभापती तलंगासाठी काही तरतूद केली नाही. विविध समित्यांच्या दौऱयासाठी एवढी का तरतूद केली आहे. येथे कोरोनाने माणसं पटापटा मरत आहेत. आणि दौरा नेमका कशासाठी की तेथे जावून कोरोना कसा नियंत्रणात आणला हे अभ्यासाला. दोन वर्षात आमच्या सदस्यांना सेस फंडाची दमडी दिली नाही आता या दौऱयाऐवजी २०, २० लाख सदस्यांना दिले तर कामे तरी सदस्यांची होतील. आता आपली परिस्थिती गंभीर आहे, नाही ती थेरं कशासाठी करता. आम्हाला सेस फंडातून किती देणार ते सांगा. तुमच्या काळात खुश करायचं आहे का ह्यांना असा मुद्दा मांडला. त्यावर काही सदस्यांनी तुमच्याच काळात पाच लाखांची तरतूद सात लाख केली ओह. बांधकामला का नाही अभ्यास दौरा. सगळ्याच सदस्यांना न्या, असा शेवटी मुद्दा त्यांनी मांडला.

  शिवदास अन् मनोज पवार यांच्यात शाब्दीक बाचाबाची

  सागर शिवदास हे बोलायला उठले तसे मनोज पवार हे त्यांना रोखू लागले. त्यावर सागर शिवदास त्यांना म्हणाले, तुम्ही ऐकण्याची मनस्थिती ठेवा. तुमच्या पार्टीतील भांडण म्हणून आम्हाला बोलू देत नाही. पाच वर्ष अशीच आमची घालवली दोन जीबी फक्त राहिल्या आहेत. बोलू द्या जरा तासभर. असे म्हणत पदाधिकारी, अधिकारी यांच्या केबीनसाठी महिन्याला अडीच लाख रुपये खर्च होतोय. तो कशासाठी येथे एकेक रुपया नागरिकांच्या विकासासाठी वापरण्यासाठी मिळवताना आम्हाला मोठा संघर्ष करावा लागतो आहे, असा मुद्दा मांडताच प्रदीप विधाते आणि उदय कबुले यांनी सेस फंडात तुमच्यावर अन्याय होवू देणार नाही असा शब्द दिला.

  आपत्त्कालिनमधून शेतीसाठी तरतूद न केल्याने तीव्र पडसाद

  बजेटमध्ये पुरामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. त्याकरता काहीच तरतूद न केल्याची बाब उदयसिंह उंडाळकर यांनी निदर्शनास आणून दिली. अनेकांच्या मोटरी वाहून गेल्या आहेत. अनेकांच्या बुडाल्या आहेत. त्यांना काहीतरी मदतीची तरतुद करायला हवी असा मुद्दा त्यांनी मांडला. भिमराव पाटील यांनी गेल्या अडीच वर्षात काहीच तरतूद करण्यात आलेली नाही, असा आरोप केला. तर कोरेगावचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांनीही आज ताडपत्री कितीला बाजारात मिळते अन् अनुदान किती दिले जाते. कोळपे कितीला मिळते अन् अनुदान किती दिले जाते अशा शब्दात कृषी सभापतींची मापे टाकली.