सातारा जिल्ह्यातील स्थानिक वाहनांना टोलमाफी द्या; बळीराजा शेतकरी संघटनेची गडकरींकडे मागणी

सातारा जिल्ह्यात दोन टोलनाके आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर एमएच १२ पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी देण्यात आली आहे.

    कराड : खेड-शिवापूर, आणेवाडी, तासवडे आणि किणी टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळावी. तसेच टोल प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि गुंडगिरीला लगाम घालावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला व पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात दोन टोलनाके आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर एमएच १२ पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी देण्यात आली आहे. त्या पध्दतीने सातारा जिल्ह्यातील आणेवाडी व तासवडे टोलनाक्यावर एमएच ११ व एमएच ५० पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी मिळावी.

    टोलनाका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली होते. परंतु, त्याबदल्यात प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. महामार्गावर जागोजाग खड्डे पडले आहे. जागोजाग पिण्याचे स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही, टॉयलेटची व्यवस्था नाही, टोल कर्मचाऱ्यांची गुंडगिरीला लगाम घालण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

    तसेच कराड-विजापूर, कराड- तासगाव या रस्त्याचं काम तीन ते चार वर्षांपासून सुरु आहे. त्या कामांना गती मिळावी. तसेच या रस्त्याच्या कामात शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. तो मोबदला लवकर मिळावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.