भारतीयांनी फॅमिली प्लॅनिंग केले असते, तर लसींचा साठा पुरला असता, उदयनराजेंचा अजब तर्क

भारतीय समाजानं जर वेळीच फॅमिली प्लॅनिंगचं महत्त्व ओळखून कुटुंब नियोजन केलं असतं, तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असा अजब दावा उदयनराजेंनी केलाय. भारतातील प्रचंड लोकसंख्येमुळे आता कोरोनाच्या लसी पुरत नसून नवा साठा उपलब्ध होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते. लोकसंख्या हीच आपली समस्या असून पूर्वीपासूनच जर फॅमिली प्लॅनिंगचा विचार केला असता, तर ही वेळ आली नसती, असं म्हणत उदयनराजेंनी नेहमीप्रमाणे धमाल उडवून दिलीय. 

    महाराष्ट्रासह देशात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातलाय. एकीकडे कोरोना रुग्णांची वाढती संख्या, दुसरीकडे लसींचा अपुरा पुरवठा आणि त्यातून निर्माण होत असलेला राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष या वादावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. आपण राजकारणापेक्षा समाजकारणावर नेहमीच अधिक भर दिला असून सध्या देशाचं आणि राज्याचं राजकारण कुठल्या दिशेनं चाललंय, हे आपल्यालाच कळायचं बंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

    भारतीय समाजानं जर वेळीच फॅमिली प्लॅनिंगचं महत्त्व ओळखून कुटुंब नियोजन केलं असतं, तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असा अजब दावा उदयनराजेंनी केलाय. भारतातील प्रचंड लोकसंख्येमुळे आता कोरोनाच्या लसी पुरत नसून नवा साठा उपलब्ध होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते. लोकसंख्या हीच आपली समस्या असून पूर्वीपासूनच जर फॅमिली प्लॅनिंगचा विचार केला असता, तर ही वेळ आली नसती, असं म्हणत उदयनराजेंनी नेहमीप्रमाणे धमाल उडवून दिलीय.

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलेल्या गो कोरोना गो, हा नारा प्रामाणिक भावनेतून दिला होता, असंही त्यांनी म्हटंलय. कोरोनाचे वास्तव नाकारणे शक्य नाही. कोरोनाने लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर सर्वात गंभीर हल्ला केला असून आर्थिक संकटात अडकलेली जनता आता कुणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र कोरोना हा एखाद्या सामान्य तापाप्रमाणे असून सरकारमधील तज्ज्ञांनी याचा विचार करूनच नियोजन  केलं असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

    लॉकडाऊन नको

    सध्याच्या आर्थिक परिस्थितीत लॉकडाऊन सामान्य माणसांना परवडणारे नाही, असं उदयनराजेंनी म्हटलंय. गरीबांची चूल पेटत राहणं गरजेचं असून निवडणुकीच्या तराजूत याचा निर्णय तोलणे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोण काय भूमिका घेतो आणि लॉकडाऊनचं समर्थन कोण करतो, तेच मी बघणार आहे, असंही उदयनराजेंनी म्हटलंय.