‘त्यांनी शपथ घेतली, की संसद आत्महत्या करते!’ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधानांवर बरसले!

“व्हिफ आला की मग तुम्ही फक्त हात वर करायचा. पक्षाने सांगितले की तुम्ही या विधेयकावर अमुक अमुक सही करा की संपले. त्यामुळे आपल्याकडे दोनच कलमे आहेत एक पंतप्रधान आणि त्यांच्या अंतर्गत असणारे आयएएस अधिकारी. सध्या तेच सरकार चालवत आहेत,” असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

    कराड :  सध्या भारतात स्थिती भयानक होत आहे, पंतप्रधानांनी शपथ घेतली की संसद आत्महत्या करते, असे थेट विधान करत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारच्या संसदीय कार्यपद्धतीला लक्ष्य केले आहे. कराडमध्ये अ‍ॅड. आनंदराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विधी सल्ला शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी कायदा विभागाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

    पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की “पार्लमेंटची निवडणूक लागली की सर्वात मोठा पक्ष आपला नेता निवडून देतो. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली की संसद आपली आत्महत्या करते. संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत. आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेत अस्तित्वात असलेली पिपल्स रिप्रेझेंटेशनची कल्पना अंमलात आणली गेलेली नाही.”  असे म्हणत त्यानी वर्मावर बोट ठेवले.

    ते म्हणाले की, राज्य घटनेनुसार लोकप्रतिनीधित्व कायद्यानुसार पार्लमेंटची निवडणूक लागली की पक्ष आपला नेता निवडून देतो. तो नेता निवडला की त्याचा दुसऱ्या दिवशी शपथविधी होतो. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली की मंत्रीमंडळ गठीत करून लोकांनी निवडणून दिलेल्या सहका-यांना त्यांचे खाते देवून कामे दिली जातात या कामांना मंत्री संसदेत बांधील असतात. मात्र, सध्या संसदच आपली आत्महत्या करते. संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत. फक्त त्या ठिकाणी लोकांनी जाऊन वेळ मिळाला तर बोलायचे. नाहीतर भत्ता घ्यायचा आणि घरी जायचे. पक्षांतर्गत या बंदीचा पूनर्विचार करायला हवा,” असेही मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

    पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “सर्व संसद सदस्यांना आणि विधानसभेच्या आमदारांना थेट मुख्यमंत्र्यांचे अथवा सत्ताधारी पक्षांचे गुलाम अशाप्रकारे वागण्याची सुरुवात झाली आहे. हे मी विधान विचारपूर्वक करतोय. कारण दीड वर्ष मी पार्लमेंटमध्ये घालवली आणि इथे १० वर्ष झाली. त्यामुळे पक्षांतर्गत कायदे बंदी करण्याचा पुनर्विचार करायला पाहिजे. फक्त त्याठिकाणी विश्वासदर्शक ठराव घेणे आवश्यक आहे. बाकी विधेयक मांडणे त्यावर मत प्रदर्शन करणे, विरोध करणे हे अधिकार दिलेले नाहीत.” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.