वाडा कंभुरोशी येथे महाआरोग्य तपासणी शिबिर; साडेचारशेपेक्षा अधिकांनी घेतला लाभ

    महाबळेश्वर : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डाॅ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यात आरोग्याच महायज्ञ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत वाडा कंभुरोशी येथे नुकतेच महाआरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषध वाटप पार पडले. या शिबिराचा किल्ले प्रमापगड पंचक्रोशीतील 22 गावांतील सुमारे साडेचारशेपेक्षा अधिक गरीब व गरजू रूग्णांना लाभ झाला, अशी माहिती शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेश कुंभारदरे यांनी दिली.

    महाबळेश्वर तालुक्यातील सुपुत्र व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या मदतीने खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी तालुक्यातील पश्चिम भागातील लोकांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी कुंभरोशी या ठिकाणी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य आंनद उतेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, तालुका प्रमुख संतोष जाधव, संजय शेलार, विभागप्रमुख बाळासाहेब पार्टे, अभय हवालदार, तुषार मोरे, व अजित कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

    विविध प्रकारच्या चाचण्या व रोग तपासणी करण्यात आली तपासणीनंतर आवश्यकता वाटल्यास पुढील उपचार देखील मोफत करण्यात येणार आहे. यावेळी डोळयांची तपासणी देखील करण्यात आली. ज्यांना चष्मा लागला आहे, त्यांना चष्मा मोफत देण्यात आले. ज्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, त्यांना पुढील वेळ देऊन त्यांच्या डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहितीही राजेश कुंभारदरे यांनी दिली.