म्हसवड शहरात पावसाची धुव्वाधार बॅटिंग; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

माणगंगा नदीपात्रात यापूर्वीच उरमोडीचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून माणगंगा नदी वाहत आहे. अशातच वरचेवर पाऊसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने माणगंगेच्या पाणीपात्रात चांगलीच वाढ झाली आहे.

    म्हसवड : गेल्या दोन दिवसांपासून म्हसवड शहर व परिसरात परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले असून, दोन दिवसांत शहरात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असल्याने शहरातील विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. तर सखल भागात पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र आहे. दरम्यान, या पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील एका दवाखान्याची धाब्याची इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली.

    यंदा माण तालुक्यावर वरुण राजाने चांगलीच कृपादृष्टी केली असून, उशीरा का होईना पण याठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावत सर्वत्र हाहाकार उडवला आहे. हथ्थी नक्षत्राने तूफान फलंदाजी करीत पावसाचा चांगलाच स्कोर वाढवला असून, आजपासून सुरु होत असलेल्या आंधळी नक्षत्राचीही सुरुवात चांगलीच होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने माण तालुक्यात चांगलीच हजेरी लावल्याने माणगंगेच्या पाणीपात्रात यामुळे चांगलीच वाढ झाली आहे. तर दमदार पडत असलेल्या पावसामुळे मात्र रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पाऊस संपताच या रस्त्यांची कामे तातडीने करावी अशी मागणी माणवासीय जनता करीत आहे.

    माणगंगा नदीत स्थानिकांची मासेमारी

    माणगंगा नदीपात्रात यापूर्वीच उरमोडीचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून माणगंगा नदी वाहत आहे. अशातच वरचेवर पाऊसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने माणगंगेच्या पाणीपात्रात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे आले आहेत. मासेमारी करण्यासाठी स्थानिक मच्छिमारांकडून माणगंगेच्या नदीपात्रात उतरुन जाळी लावली जात आहेत.