वाईच्या पश्चिम भागातील जांभळी आणि जोर खोऱ्यात पावसाचे थैमान; लाखो रुपयांचे नुकसान

    वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभळी आणि जोर खोऱ्यात कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने भात शेतीसह घरे खचली. तर अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. बलकवडी, नांदगणे, फणसेवाडी या गावांकडे जाणारा पूल वाहुन गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे.

    दिवसरात्र सुरु असलेल्या पावसाने जांभळी आणि जोर या दोन्ही खोऱ्यातील गावांमध्ये हाहाकार
    माजवला आहे. नुकत्याच काही गावांमध्ये कर्ज काढून येथील शेतकऱ्यांनी ५० टक्के भात लागणी पूर्ण केल्या होत्या. तर शिल्लक भात लागणीची लगबग सुरु असतानाच बुधवारी (दि.२१) दिवसरात्र मुसळधार पावसाने जांभळी आणि जोर खोरे झोडपून काढल्याने या दोन्ही विभागातील शेतकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत. तरीही येथील शेतकऱ्यांनी पहाटे उठून आपल्या शेतजमीन जाऊन पाहिले असता त्या वाहून गेल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.

    बुधवारी कोंढावळे येथील एका कातकरी समाजातील ६५ वर्षीय वृध्दाचा झोपेत असताना मध्यरात्री छप्पर कोसळल्याने मृत्यू झाला होता, याची माहिती तेथील पोलिस पाटलाने वाई प्रशासनाला देण्याची काळजी
    घेतली नाही. अशा बेजबाबदार पोलिस पाटलांची वाईच्या तहसीलदारांनी चौकशी करुन हकालपट्टी करतील का? या मुसळधार पावसामुळे जांभळी गावचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती माजी सरपंच संतोष खरे आणी माजी पोलिस पाटील आनंदा कांबळे यांनी दिली. तर कुठेही जीवितहानी होऊ नये म्हणून ते काळजी घेत आहेत.