कराडमध्ये मुसळधार पाऊस; ८८ मिमी पावसाची नोंद

    सातारा : कराड तालुक्यात बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून आज (गुरुवार) सकाळी आठ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. एक जूननंतर तालुक्यात प्रथमच अतिवृष्टीची नोंद झाली असून, तालुक्यातील सर्व विभागांचा विचार करता तालुक्यात सरासरी ८८.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुपने आणि कोपर्डे हवेली मंडल विभागात पावसाने जवळपास शतक गाठले आहे. गुरुवारी सकाळी आठनंतरही पावसाचा जोर कायम असून, संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले.

    तालुक्यातील कराड मंडल विभागात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कराड ९५ मिलिमीटर, मलकापूर मंडल विभागात ९३ मिलिमीटर, सैदापूर मंडल विभागात ९० मिलिमीटर, कोपर्डे हवेली मंडल विभागात ९८ मिलिमीटर, मसुर मंडल विभागात ७५ मिलिमीटर, उंब्रज मंडल विभागात ८५ मिलीमीटर, शेणोली मंडल विभागात ८८ मिलिमीटर, कवठे मंडल विभागात ८२ मिलिमीटर, काले मंडल विभागात ८० मिलिमीटर, कोळे मंडल विभागात ८७ मिलिमीटर, उंडाळे मंडल विभागात ८५ मिलिमीटर, सुपने मंडल विभागात ९९ मिलिमीटर आणि इंदोली मंडल विभागाचा ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सर्व मंडल विभागात एकूण ११४५ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी ८८.०७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.