कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम

    सातारा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची संततधार कायमच असून, पाणलोट क्षेत्रातील नवजा, महाबळेश्वर, वलवण या ठिकाणी उच्चांकी पावसाच्या सरीवर सरी बरसतच आहेत. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक १ लाख ७३ हजार ९३४ बनली असून, धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. धरणाची वाढत जाणारी जलपातळी नियंत्रित करण्याचे प्रयोग कोयना प्रशासनाने पायथा वीजगृह आजपासून चालू केले आहेत. उद्या कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे उघडून वाढत जाणारी जलपातळी नियंत्रित करण्याचा दुसरा प्रयोग केला जाणार आहे.

    मुसळधार पावसाचे आगर असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे ३४७ मिमी, नवजा येथे ४२७ मिमी तर महाबळेश्वर येथे ४२४, तर वलवण येथे ४५८ इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार व रौद्ररूप कायमच आहे. गुरुवारी दुपारी २ पर्यंत कोयनानगर येथे १२५ मिमी, नवजा येथे १५५ मिमी तर महाबळेश्वर येथे १२५ मिमी व वलवण येथे २०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात पाच तासात ४ टीएमसीने वाढ झाली आहे.

    कोयना धरण परीचलन सूचीप्रमाणे २२ जुलैला धरणाची जलपातळी २१२७.०० फूट तर धरणात ६७.४१ टीएमसी पाणीसाठा असणे गरजेचे आहे. धरणाची जलपातळी सध्या २१३०.६ फूट असून, धरणात ७०.५१ टीएमसी आहे. धरणात साडेतीन टीएमसी पाणीसाठा जादा असल्याने कोयना धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचा पायथा वीजगृह १२.०० वाजता कार्यान्वित करण्यात आला आहे.

    धरणातून नदीपात्रात २१०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोयना धरणात २१३३.५ फूट ही जलपातळी व धरणात ७३.०० टीएमसी पाणीसाठा झाल्यावर सहा वक्र दरवाज्यांना पाणी टेकते, ही लेव्हल येण्यासाठी ३ फूट पाण्याची गरज आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे धूमशान सुरुच असल्याने गुरुवारी दिवसभरात ही लेव्हल येऊ शकत असल्याने कोयना प्रशासनाने धरणाचे सहा वक्र दरवाजे गुरुवारी अथवा शुक्रवारी उघडण्याची तयारी केली असल्याचे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नीतेश पोतदार यांनी स्पष्ट केले आहे.