वाईच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस; अंगावर छप्पर कोसळल्याने एकाचा मृत्यू

    वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस आणि वेगवान वारा सुरु आहे. कोंढावळे येथील कातकरी वस्तीत एका छपरात राहणाऱ्या वामन जाधव (वय ६५) यांच्या अंगावर गाढ झोपेत असतानाच मध्यरात्री छप्पर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

    बाजीराव नवघणे पुढे माहिती देताना म्हणाले की, वाई तालुक्यातील पश्चिम भागात कोंढावळे गावाच्या हद्दीतील पूर्व दिशेला असणाऱ्या सुतारकी नावाच्या शिवारातील ओढ्याच्या कडेला गेल्या कित्येक वर्षांपासून पाच ते सहा कुटुंबे गवती छपरे घालून राहत आहेत. यापैकी एका छपरात वामन जाधव (वय ६५) हे वयोवृद्ध गृहस्थ एकटेच राहत होते. त्यांची मुले-सुना शेजारच्या छपरात राहत होती. गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम भागात रिमझिम पावसाबरोबर वेगवान वारेही सुरु आहे. या वेगवान वाऱ्याचा प्रभाव येथील एका छपरावर असल्याने गाढ झोपेत असणाऱ्या वामन जाधव यांच्या अंगावर मध्यरात्रीच्या वेळी हे छप्पर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    सकाळी वडील झोपलेले छप्पर जमीनदोस्त झाल्याचे पाहून वडिलांचा शोध मुलगा आणी सुनेने सुरू केला असता ते सापडत नसल्याने त्यांनी जमीनदोस्त झालेले छप्पर ऊचकटण्यास सुरुवात केली. त्यानंतर वामन जाधव हे त्या ठिकाणी मृत अवस्थेत सापडल्याने तेथील नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या गरीब कातकरी समाजावर काळाने घाला घातल्याने पश्चिम भागातील गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाई तालुक्यात पावसासह वाऱ्याने पहिला बळी घेतला आहे. तरी प्रशासनाने मृत वामन जाधव यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी आणी पश्चिम भागातील कातकरी समाजातील लोकांचे सर्वेक्षण करुन त्याना शासकीय जागा उपलब्ध करुन घरकुल बांधून द्यावीत, अशी मागणी वासोळे गावचे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवघणे यांनी केली आहे.