सोसायटी मतदारसंघावरून रंगणार ‘हाय व्होल्टेज ड्रामा’

    सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पक्षविरहित आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. मात्र, उमेदवारीवरुन मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. सोसायटी गटातून खुद्द सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे दोघेही आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे हे ट्विस्ट कसे संपणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षांनी सक्रिय भूमिका घेतली आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याने जिल्हा बॅंकेसाठी आपला विचार व्हावा, आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळची निवडणूक सोपी करण्यासाठी तडजोडीचे राजकारण करावे लागेल, असे चित्र आहे.

    सातारा जिल्हा बॅंकेला नावारुपास आणण्यात माजी मंत्री कै. उंडाळकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी अनेक वर्षे जिल्हा बॅंकेत सोसायटी गटातून नेतृत्व केले. त्यांनी बॅंकेत एकहाती सत्ता ठेवून आपले वर्चस्व सिध्द केले होते. त्यांच्याकडे सत्ता असताना जिल्हा बॅंकेला सलग सहा वर्षे नाबार्डने पुरस्कार देवून गौरवले होते. त्यांच्याच काळात बॅंकेकडून शेतकरी हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले. नुकतेच उंडाळकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र ऍड. उदयसिंह पाटील हे जिल्हा बॅंकेत सोसायटी गटातून जावे, अशी रयत संघटनेतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्या गटातूनच निवडणूक लढवावी यासाठी ते ठाम आहेत. त्यासाठीची व्यूव्हरचनाही त्यांनी केली आहे

    दरम्यान, राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही सोसायटी गटातून उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनाही सोसायटी गटातूनच उमेदवारी करणार असल्याचे यापूर्वीच मंत्री पाटील यांनी सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी चांगलीच तयारी केली आहे. सहा महिन्यापूर्वीपासून त्यांनी त्यासाठी बरीच सुत्रे हालवून आखणी सुरू केली आहे. त्यांच्या सोसायटी गटातील उमेदवारीबाबत त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकांही झाल्या आहेत. सहकार मंत्री पाटील व काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी ऍड. उंडाळकर या दोघांनीही सोसायटी गटातूनच उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचे काय होणार, हे ट्विस्ट कसे सोडवले जाणार याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.