जिल्ह्यात हिंगणी आदर्श बनविणार : सरंपच रुक्मिणी हुंबे

    म्हसवड : सातारा जिल्हा हा शूरविरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या पूर्वेकडील शेवटच्या टोकाचे गाव म्हणून माण तालुक्यातील हिंगणी गावची ओळख आहे. विकासापासुन कोसो दुर राहिलेल्या या गावात शासनाच्या सर्व योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवून विकासकामांचा नवा आदर्श जिल्ह्यात निर्माण करू, असा विश्वास लोकनियुक्त सरपंच रुक्मिणी मच्छींद्र हुंबे यांनी व्यक्त केला.

    प्रभावीपणे समाज प्रबोधन

    राज्य शासनाचे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान प्रभावीपणे राबवून काेराेनाचा अटकाव करण्यात अाला. काेराेनाविरूद्ध लढाईत ग्रामस्थ व पदािधकाऱ्यांनी सक्रीय सहभाग नाेंदविला. नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. संपुर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. अल्पावधीतच कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले हिंगणी गाव कोरोनामुक्त गाव म्हणून माण तालुक्यात गणले गेले आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, दक्षता कमिटी, आरोग्य कर्मचारी, आशासेविका, ग्रामसेवक या सर्वांचे मोठे योगदान लाभले, असे सरपंच हुंबे यांनी सांगितले.

    विस्तारित पाणी पुरवठा योजना राबविणार

    ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरु असुन माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या फंडातून वाड्या-वस्त्यावर पाणी पुरवठा योजना सुरु आहे. पुढील १० वर्षाचा विचार करुन हिंगणी गावासाठी ६ कि.मी. अंतराची सर्वात मोठी विस्तारित नवीन पाणी पुरवठा योजना राबविणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन गावात ठिकठिकाणी हायमास्ट बसवून गाव प्रकाशमान केले आहे. गावात ठिकठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. अद्ययावत स्मशानभूमी व बंदीस्त गटार व सुसज्ज रस्ते करून विकासकामे मार्गी लावणार आहे, असे सरपंच हुंबे यांनी सांगितले.

    ग्रामपंचायतीच्या इतिहासात १९५७ सालापासून मराठा समाजातील महिलेला गावच्या सरपंच पदाचा सन्मान मिळाला नाही. तो सन्मान मला मिळाला. ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला गावची सेवा करण्याची संधी दिली. पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, घनकचरा नियोजन, स्वच्छ व वेळेत पाणीपुरवठा, शिक्षण सुविधा, दळणवळणाची साधने, महिलांचे सबलीकरण यावर भर राहणार आहे.

    – रुक्मिण हुंबे, सरपंच, हिंगणी

    (शब्दांकन – महेश कांबळे, म्हसवड)