शुल्क सवलतीसाठी शाळेवर धडक ; पालकांची गर्दी पाहताच शाळा व्यवस्थापनाचे कर्मचारी गायब

  सातारा : शुल्क कपातीच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या सातारा शहरातील पालकांनी सदर बझार येथील शाळेवर ठिय्या दिला. पालकांचा आवेश आणि गर्दी पाहून शाळा प्रशासनाची यंत्रणा तेथून तत्काळ गायब झाली. साताऱ्यात काेरोनाच्या संक्रमणामुळे आर्थिक दृष्टया पालक वर्ग प्रचंड अडचणीत अाले आहेत. त्यामुळे जेवढी सेवा तितकेच शुल्क या मागणीसाठी सातारा जिल्हा पालक संघ शहरात सक्रीय झाला आहे.

  निवेदनास दाखविली केराची टोपली
  सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सदर बझार येथील अल्पसंख्याक समितीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शाळेवर सुमारे दीडशेहून अधिक पालकांनी धडक दिली. मात्र शाळा प्रशासनाकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त पालकांनी शाळेच्या ओपन हॉलमध्ये सभा घेत यंदा पालकांना पन्नास टक्के शुल्क सवलत मिळालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. काही पालकांनी काही शिक्षकांना गाठण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. शाळेच्या आवारातच पालकांच्या आक्रमक भूमिकेमुळे तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. नंतर पालकांनी आपली भूमिका सौम्य करत शाळा प्रशासनाला पुन्हा दोन दिवसाची मुदत दिली आहे. काेरोना काळात करण्यात अालेल्या लॉकडाउनमुळे सर्व लोकांची आर्थिक उत्पन्नाची साधने बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची यंदाची आणि मागील वर्षाची शाळेची ऑनलाइन शिक्षण पद्धतीची असलेली फी कमी करावी, अशा मागणीचे निवेदन शाळा प्रशासनाला सादर करण्यात आले. मात्र, प्रशासनाने निवेदनास केराची टोपली दाखवली.

  शाळा प्रशासनािवराेधात पालक आक्रमक
  स्वप्नील राऊत यांच्या वतीने स्कुलच्या प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, निर्मल स्कूलच्या प्रशासनाने मागील वर्ष आणि चालू वर्षांमध्ये ५० टक्के सवलत मान्य करावी, अशी मागणी करणारे अर्ज दिले होते. मात्र त्या निवेदनांचा फारसा सकारात्मक विचार झाला नाही. स्कूलच्या प्रशासनाने मागील वर्ष व चालू वर्षामध्ये ५० टक्के फी मध्ये सवलत द्यावी व पालकांनी केलेली मागणी मान्य करावी. जी ऑनलाईन शिक्षण सुविधा स्कुलमध्ये आहे. तेवढीच फी आकारण्यात यावी, असे निवेदनात म्हटले अाहे. स्कुलच्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने या प्रकाराविरोधात पालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  आजपर्यंतची शालेय फी व इतर मागण्या लक्षात घेत विनातक्रार वेळेवर फी पालक भरत आले आहेत. परंतु मागील महिन्यापासून जागतिक स्तरावरील कोव्हीड-१९ प्रसारामुळे सरकारने जो दोनवेळा लॉकडाऊन घोषीत केला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना आपले व्यवसाय बंद करावे लागले. उत्पनाचेच सर्व मार्ग बंद असल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीसुध्दा काही पालकांनी निम्मी फी भरलेली आहे.

  -स्वप्नील राऊत, पालक संघ