honey trap

राष्ट्रवादी युवा नेत्याच्या सहभागाने चर्चेला उधाण

    सातारा : पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी हनी ट्रॅपचा प्रयोग करणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि. पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण, जि. पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मयुर साहेबराव मोहिते-पाटील यांनी फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा व अामदाराच्या भावकीतील व्यक्तीचा यात सहभाग असल्याने खळबळ उडाली अाहे.

    युवतीनेच केला भांडाफोड
    संशयितांनी साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून बदनामीच्या भितीने त्यांच्याकडून लाखो रूपयांची माया गोळा करण्याचा डाव आखला होता. त्या बदल्यात त्या युवतीला काही रक्कम संशयितांनी दिली होती. मात्र, त्या युवतीनेच संशयितांचा भांडाफोड करून हे प्रकरण उजेडात आणले. दि. २२ एप्रिल रोजी साताऱ्यातील त्या युवतीने तक्रारदार मयुर यांना फोन करून या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला.

     संशयितांनी असा रचला डाव
    चौकशीत त्या युवतीने दिलेली माहिती अशी की, शैलेश मोहिते व राहुल कांडगे हे दोघे दि. १२ एप्रिल रोजी साताऱ्यात संबंधित युवतीला भेटण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांनी तिला आपल्याला आमदार मोहिते-पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत पाहिजे असल्याचे सांगितले. त्याबदल्यात संशयितांनी त्या युवतीला काही रोख रक्कम व पुण्यात एक फ्लॅट देण्याचे कबुल केले होते. त्यासाठी तुला त्यांच्याकडे नोकरीच्या बहाण्याने जायचे असून त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांची बदनामी करावी लागेल, असा प्लॅन संशयितांनी युवतीला दिला. त्याबदल्यात तीला वेळोवेळी ९० हजार रूपये देण्यात आले होते. मात्र, हा सगळा प्रकार मनाला न पटल्याने त्या युवतीने आमदारांचे पुतणे व तक्रारदार मयुर यांना फोन करून सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नसून पुढील तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.