खटाव-माणसाठी एचआरसीटी सुविधा उपलब्ध करुन देणार : चेतना सिन्हा

    वडूज : खटाव-माण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी लवकरात लवकर माफक दरात एच.आर.सी.टी. सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी माणदेश फाऊंडेशन व माणदेशी महिला बँकेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती संस्थापिका चेतना सिन्हा यांनी दिली.

    सातेवाडी (ता. खटाव) येथील मधुमाला सांस्कृतिक भवनमधील हुतात्मा आयसोलेशन कक्षाच्या भेटीप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजी सभापती संदिप मांडवे, रा.स.प.चे युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, सातेवाडीचे माजी सरपंच हणमंतराव कोळेकर, पेडगांवचे विजय जगदाळे, रमेश शिंगाडे, निकम, मोहिते, स्मिता टकले यांची प्रमुख उपस्थिती होती.

    सिन्हा म्हणाल्या, एच.आर.सी.टी. सुविधा व अन्य तांत्रिक आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत खटाव-माण तालुक्यातील अनेक रुग्ण व नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. योग्य निदान न झाल्याने काहींचे बळी गेले. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वीच एच.आर.सी.टी. सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आपला मानस आहे. याशिवाय भविष्यात दोन्ही तालुक्यासाठी चांगल्याप्रकारे धर्मादाय हॉस्पिटल निर्माण करण्यासंदर्भातही त्यांनी यावेळी सुतोवाच केले.

    तसेच खटाव-माण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आहार व अन्य आरोग्य साहित्य पुरविले ही आत्मिक समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. सिन्हा यांनी हुतात्मा आयसोलेशन कक्षास भेट देऊन पाठीवर शाब्बासकीची थाप टाकल्याने कार्यकत्यांचे नैतिक बळ वाढल्याचे संदिप मांडवे यांनी सांगितले. यावेळी शुभम चव्हाण, सौरभ साठे, लखन पवार यांचीही मनोगते झाली. आयाज मुल्ला यांनी सुत्रसंचालन केले. धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील मान्यवर व जनता गॅरेजचे स्वयंसेवक उपस्थित होते.