महाबळेश्वर तालुक्यात शंभर टक्के लसीकरण

  सातारा : तीन महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात वेगाने लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्याचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, पश्‍चिम महाराष्ट्रात महाबळेश्‍वर पहिला तालुका ठरला आहे. दरम्यान, जिल्ह्याची १८ वर्षांपुढील २१ लाख लोकसंख्या असून, आतापर्यंत १९ लाख ३० हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने जिल्ह्याचे एकूण सरासरी ९० टक्के लसीकरण झाले आहे.

  जिल्ह्यात एक जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. सुरवातीच्या टप्‍प्यात जिल्ह्याला लशींचे डोस जादा आल्याने लसीकरण मोहीम वेगाने सुरू होती. मात्र, एप्रिल ते जून महिन्यापर्यंत लसीकरण मोहीम लशींअभावी मंदावल्याचे दिसून आले. मात्र, जुलै महिन्यानंतर जिल्ह्यात लसीकरणाची संख्या वाढल्याचे दिसून आले. लशींची संख्या जादा उपलब्ध झाल्याने एकाच दिवसात तब्बल ६० हजार लसीकरणाचीही नोंद दोन आठवड्यांपूर्वी झाली आहे.

  याचबरोबर लसीकरण सत्रांचीही संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे, सातारा जिल्ह्याचा लसीकरणाच्या आकडेवारीत पश्‍चिम महाराष्ट्रात तिसरा क्रमांक असून, राज्यभरात महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्याचा विचार करता सातारा जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागत आहे. जिल्हा प्रशासनाने लशींच्या बाबतीत पाठपुरावा केल्याने लशींचे डोसही जादा मिळत असल्याचे दिसून येत आहे. या लसीकरणात सातारा जिल्हा अव्वल ठरत असून, लसीकरणात आरोग्य सेविका, आशा सेविका यांचे मोठे योगदान आहे.

  पश्‍चिम महाराष्ट्रात लसीकरणात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्याचे १०० टक्के लसीकरण झाले आहे. तसेच, राज्यभरातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात वेगाने लसीकरण सुरू आहे. याचबरोबर, लसीकरण सत्रांचीही संख्या वाढविण्यात आली आहे.

  – डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा

  जिल्ह्याचे लसीकरण…

  – जिल्ह्याची एकूण लोकसंख्या (पात्र) : २० लाख ८० हजार

  – पहिला डोस : १३ लाख ६५ हजार

  – दुसरा डोस : पाच लाख ६५ हजार ३३८

  – महाबळेश्‍वर तालुका : एकूण लोकसंख्या ५१,२८४

  – पहिला डोस : ५१,२७७ दुसरा डोस : २२,४५३

  दुर्गम भागात घरोघरी जाऊन लसीकरण

  महाबळेश्‍वर तालुक्यात दुर्गम भाग जास्त असल्याने आरोग्य केंद्रात येण्यासाठी नागरिकांना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन शेवटच्या टप्‍प्यात आरोग्य विभागाने सुमारे पाच हजार नागरिकांचे लसीकरण घरोघरी जाऊन केले आहे. त्यामुळे, डोंगरात वसलेल्या गावांची गैरसोय आरोग्य विभागाने दूर करत नागरिकांचे लसीकरण केले.