Five killed due to alcohol poisoning in rajasthan

घटनास्थळावरून अवैध देशी दारूचे बॉक्सही ताब्यात

    सातारा : दारूच्या कारणावरुन पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणात पतीने लाकडी।दांडक्याने केलेल्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला.मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.मालन बबन गायकवाड(वय.५५,रा.नागठाणे, ता.सातारा) असे मृत महिलेचे नाव असून बोरगाव पोलिसांनी पती बबन बाबुराव गायकवाड(वय.६०) याला अटक केली आहे.दरम्यान खुनाचा तपास करत असताना पोलिसांना घटनास्थळावरून अवैध विक्रीसाठी ठेवलेले देशी दारूचे तीन बॉक्स सापडले.

    याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,बबन गायकवाड हा पत्नी मालन हिच्यासह नागठाणे येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेलसमोरील चाळीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत.हे दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते.या दोघांनाही दारू पिण्याचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मंगळवारी सकाळी मालन गायकवाड या घरात मृतावस्थेत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले.याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यानंतर सपोनि डॉ.सागर वाघ,पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर,हवालदार राकेश देवकर,राजू शिखरे,विशाल जाधव,प्रकाश वाघ,अमित पवार,महिला पोलीस शीतल शिंदे व चालक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरवात केली.मृत मालन गायकवाड यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर मारहाणीच्या गंभीर जखमा तसेच अंगावर मारहाणीचे वळ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

    यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून पती बबन गायकवाड याला संशयावरून ताब्यात घेतले.त्याच्याकडे कसून चौकशी केली असता पत्नी मालन ही दारू पीत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडणे होत असायची.याच कारणावरून सोमवारी रात्री उशिरा दोघांच्यात जोरदार भांडण झाले.याचे पर्यावसन मारामारीत होऊन बबन गायकवाड याने मालन गायकवाड हिला लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी पती बबन गायकवाड यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ करत आहेत.

    दरम्यान,या खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात घटनास्थळी पोलीस पाहणी करत असतानाच मृताच्या घरात एक नवी कोरी पत्र्याची पेटी कुलूपबंद असलेली आढळली.संशय आल्याने याची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूच्या बाटल्या असलेले तीन बॉक्स आढळले.ही दारू अवैधरित्या विक्रीसाठी आणल्या असून त्या नागठाणेतीलच अविनाश अरविंद साळुंखे याच्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.