NCP State President and Water Resources Minister Jayant Patil's visit to Bhandara

  सातारा : सक्तवसुली संचालनालयाबाबत (ईडी) ज्यांना नोटीस आली आहे ते घाबरले आहेत, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. सरकारविरोधात बोलले की ईडी मागे लावतात. लोकांना घाबरवण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या मागे लागून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवरूपराजे खर्डेकर, राजकुमार पाटील उपस्थित होते.

  जयंत पाटील म्हणाले, सरकार व सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणावयाचे. त्यांच्यावर सीबीआय, ईडी अशा माध्यमातून चौकशीचा ससेमिरा लावायचा आणि सरकारला पाडण्यासाठी जे-जे शक्य आहे, ते -ते करायचे असा भाजपकडून एक कार्यक्रम ठरवण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

  जरंडेश्वरला कर्जपुरवठा नियमानुसारच

  जयंत पाटील पुढे म्हणाले, आम्हाला आमचे कोणतेही सहकारी यात दोषी आहेत असे दिसत नाही. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जरंडेश्वरला जो कर्जपुरवठा केला आहे, तो सर्व नियमानुसारच केला आहे. याची माहिती ईडीला देण्यात आली आहे.

  मला ईडीची भीती वाटतं नाही

  तुम्हाला ईडीची भीती वाटते का? या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, अशी भिती वाटण्याचा काही प्रश्न नाही. मला ईडीची भीती वाटत नाही. ज्यांना नोटिस आली आहे ते घाबरले आहेत, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. सरकारच्या विरोधात बोलले की ईडी मागे लावतात. लोकांना घाबरवण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे.