जरंडेश्वर कारखान्या संदर्भात मला बोलायचेच नाही ; आरोप करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकारले

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वबळावर असे विचारले असता उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मकरंद पाटील, शशिकांत शिंदे हे एकत्र बसून निर्णय घेतील.

    सातारा : “मी नियमाने वागणारा माणूस आहे, त्यामुळे जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत आरोप करणाऱ्यांविषयी मला काहीही बोलायचे नाही”, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी चांगल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात साखर कारखाने द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

    खटाव येथील मेळाव्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी जरंडेश्वर साखर कारखान्यावर आरोप केले जात आहेत, याविषयी विचारले असता, पवार म्हणाले, की असल्या लोकांविषयी मला काहीही बोलायचे नाही, सर्व काही नियमानुसार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की मी नियमाने वागणारा माणूस आहे, असे त्यांनी स्पष्ट करत अधिक बोलणे टाळले.

    खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या खोचक टिकेवरही अजित पवार यांनी अधिक बोलणे टाळत मला त्यामुद्द्यावर बोलायचे नाही, असे सांगत मला विकासाच्या मुद्यावर बोलायचे असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

    सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वबळावर असे विचारले असता उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मकरंद पाटील, शशिकांत शिंदे हे एकत्र बसून निर्णय घेतील. स्थानिक पातळीवर आम्ही लक्ष घालत नाही, स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपवली जाते. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घेतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.